मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मराठी संस्कृतीचा ऐतिहासिक अभिमान असलेल्या मोडी लिपीच्या संवर्धन, पुनरुज्जीवन आणि प्रसाराच्या उद्देशाने श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि शिवस्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोडी लिपी – मोफत शिकवणी वर्ग आयोजित करण्यात आले आहेत.
हे प्रशिक्षण वर्ग ११ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असून, एकूण १० रविवार हे वर्ग घेतले जाणार आहेत.असून, वर्गांचे स्थळ दादर येथे असणार आहे.
या मोफत प्रशिक्षणात मोडी लिपीची मूलभूत ओळख, अक्षररचना व लेखनपद्धती, प्राथमिक वाचन–लेखन प्रशिक्षण यासोबतच सराव आणि वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात येणार आहे. अनुभवी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष लेखनाचा सखोल सराव करून घेतला जाणार असून, मोडी लिपीचा इतिहास व तिची पार्श्वभूमी यांची माहितीही दिली जाणार आहे. यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना मराठीच्या प्राचीन दस्तऐवजांशी थेट परिचयाची सुरुवात होणार आहे.
मोडी लिपी शिकणे म्हणजे आपल्या वैभवशाली इतिहासातील बखरी, राजपत्रे, दस्तऐवज व शिलालेखांशी थेट नातं जुळवण्याची दुर्मिळ आणि अमूल्य संधी आहे. ही लिपी पुन्हा जिवंत ठेवणे आणि तिचा मौल्यवान वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.
या मोफत प्रशिक्षण वर्गाच्या अधिक माहितीसाठी सर्व इच्छुकांनी शिवस्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठानच्या संचालिका वनिता साळुंखे – ९७०२२०८२११ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
