ठाणे :
रामायण–महाभारतावर हजारो ग्रंथ लिहिले गेले असले तरी त्यातील अनेक अज्ञात स्त्री व्यक्तिरेखांचे सखोल संशोधन अद्याप झालेले नाही. लेखक अॅड. रुपेश पवार यांच्या *“स्त्री जीवनाची गाथा – रामायण महाभारत”* या पुस्तकातून अशा संशोधनाच्या खुणा स्पष्टपणे दिसून येतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखिका व निरूपणकार प्रज्ञा पंडित यांनी केले. चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाट्यतुषार यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे संपन्न झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. ” स्त्रिया या इतिहासाच्या कडेला नाही तर त्या कायमच इतिहासाच्या मध्यस्थानी राहिलेल्या आहेत. आज या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक रुपेश पवार यांनी स्त्री व्यक्तिरेखांवर केलेले लेखन हे विशेष आहे” असे वक्तव्य यावेळी त्यांनी केले.
शारदा प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे प्रकाशन प्रा.प्रज्ञा पंडित यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक कीर्तीचे चित्रकार व साहित्यिक विजयराज बोधनकर होते. शारदा प्रकाशनचे डॉ. संतोष राणे यांनी या प्रसंगी मान्यवरांना ग्रंथ भेट म्हणून 2500 पुस्तके वाचकांना भेट स्वरूपात दिली. अँड रुपेश पवार यांचे चैतन्य मराठी म्युझिक हे युट्युब चॅनेलचेही प्रकाशन झाले ज्यावर अभिजीत हरळीकर दिग्दर्शित आणि निर्मित गायिका सुषमा कुलकर्णी यांनी गायलेले “असा हा मोहे गारवा” हे मराठी गीत प्रदर्शित झाले.त्यांच्या सहकार्याने रुपेश पवार यांनी यापूर्वीही तीन गाणी प्रकाशित केली असून, *चैतन्य म्युझिक* युट्युब चॅनेलवर जुनी हिंदी-मराठी तसेच त्यांची स्वतःची गाणीही सादर करण्यात येणार आहेत. तसेच कलात्मक दिवाळी अंक स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला ज्याचे परीक्षण लेखक रामदास खरे व डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी केले
लेखक रुपेश पवार यांनी यावेळी सांगितले की, रामायण–महाभारतातील स्त्री व्यक्तिरेखांवर अनेकदा चुकीच्या व अप्रामाणिक गोष्टी मांडल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर स्त्री जीवनाचे सत्य व संदर्भांसहित चित्रण करण्या करता हे मी पुस्तक लिहिले आहे.** कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयराज बोधनकर यांनी दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करणे हे आव्हानात्मक कार्य असून राजेंद्र गोसावी व रुपेश पवार यांनी ते यशस्वीपणे पार पाडल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले. त्यांनी रुपेश पवार यांच्या पुस्तकालाही शुभेच्छा दिल्या.
शारदा प्रकाशनचे प्रकाशक डॉ. संतोष राणे यांनी लेखक रुपेश पवार यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाचे व सामाजिक भान जपणाऱ्या दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थी व युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे साहित्य निर्माण करणारे लेखक म्हणून रुपेश पवार यांची ओळख त्यांनी अधोरेखित केली.
या सोहळ्यास ठाणेकर नागरिक, साहित्यप्रेमी, कलाकार, लेखकांचे नातेवाईक व ज्ञानदीप पतपेढी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री श्रुती रसाळ यांनी केले, तर वैशाली न्यायनिर्गुणे व योगेश्वरी बन यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली. इंटरनॅशनल आर्टिस्ट मोहम्मद शफी व सहकारी बुंटी हुडा यांनी या सोहळ्यात “सपनों के गीत” हा हिंदी गीतांचा कार्यक्रम केला त्यात त्यानी लोकप्रिय हिंदी गाणी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.ठाण्यातील ज्येष्ठ लेखक समाजसेवक श्री राजेंद्र गोसावी यांनी या संपूर्ण कार्यक्रमा च्या समन्वयाची भूमिका समर्थपणे पार पाडली.
