माडखोलात कारचा भीषण अपघात; पर्यटक थोडक्यात बचावले
सावंतवाडी :
तालुक्यातील माडखोल परिसरात आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने अचानक हुलकावणी दिल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सांगली-मिरज येथील काही पर्यटक सुट्टीनिमित्त आपल्या कारने गोव्याच्या दिशेने प्रवास करत होते. दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार माडखोल येथे पोहोचली असता समोरून येणाऱ्या वाहनाने अचानक हुल दिली. त्यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्यालगत असलेल्या भिंतीवर जोरात आदळली.
या अपघातात कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र धडकेमुळे कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
