मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची उत्साहात सांगता
प्राथमिक विभागात दत्ताराम लाड, माध्यमिक विभागात ओम आंबेरकर प्रथम
मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग व भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल, मसुरे मर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात प्राथमिक विभागातून दत्ताराम आनंद लाड तर माध्यमिक विभागातून ओम चंद्रशेखर आंबेरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शिक्षक प्रतिकृती विभागात प्राथमिक गटातून डी. एन. प्रभूगावकर व माध्यमिक गटातून विष्णू दत्ताराम काणेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
सर्व विजेत्यांना मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिके प्रदान करण्यात आली. या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक, माध्यमिक, दिव्यांग विद्यार्थी तसेच शिक्षक व प्रयोगशाळा परिचर यांच्या प्रतिकृती सादर करण्यात आल्या.
तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी तसेच भविष्यात संशोधनाची आवड वाढावी, हा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी गुगल, चॅट जीपीटी, एआय, जेमिनी, नोटबुक एलएम यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्वक वापर करावा, असे आवाहन यावेळी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, केंद्रप्रमुख नारायण देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सायली म्हाडगूत यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर यांनी मानले.
