मालवण :
कोकणातील विविध क्षेत्रांत निस्वार्थी आणि उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘कोकण रत्न पदवी पुरस्कार’ यावर्षी मालवण तालुक्यातील ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांना जाहीर झाला आहे.
ॲड. मांजरेकर यांनी सामाजिक कार्य, युवक सक्षमीकरण, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि पर्यावरण संवर्धन या चारही महत्त्वाच्या क्षेत्रांत सातत्याने आणि प्रभावी कार्य केले आहे. त्यांच्या भरीव योगदानाच्या दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
हा पुरस्कार प्रदान सोहळा १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाला स्वतंत्र कोकणराज्य अभियान संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे, ज्येष्ठ पत्रकार सचिन कळझुनकर यांसह कोकणातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांतून तब्बल १४०० पेक्षा अधिक नामांकन आले होते. गुणवत्ता, सातत्य आणि समाजकारणातील प्रभावी योगदान या निकषांवर आधारित निवड करण्यात आली, ज्यात ॲड. मांजरेकर यांची निवड झाली आहे.
