माझ्या विकासात्मक इच्छाशक्तीला तुमच्या आशीर्वादाची जोड द्या : ना. नितेश राणे
सावंतवाडी शहरातील नागरिकांशी साधला संवाद
समस्या जाणून घेत दिली सर्वांगीण विकासाची ग्वाही
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी शहर पर्यटन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साधण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि शासनामध्ये समन्वयाची आणि एकाच पक्षाची सत्ता असणे महत्वाचे आहे. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पालकमंत्री म्हणून मी प्रयत्नशील आहे.
केंद्रात व राज्यात आमचीच सत्ता आहे त्यामुळे नगरपालिकेतही आमच्याच विचारांची सत्ता आल्यास आमच्या विकासात्मक इच्छाशक्तीला तुमच्या आशीर्वादाची जोड दिल्यास या शहराचा पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिली.
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सावंतवाडी शहरातील नागरिकांशी संवाद साधताना विकासाचे व्हिजन आणि नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
ना. राणे यांनी आपल्या संवादात स्पष्ट केले की, शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व सत्ताकेंद्र जर शासनासोबत असतील, तर कामांमध्ये सुसूत्रता येते. एक दुसऱ्याशी संवाद साधला जाईल आणि शहराचा विकास साधणं सोपं जाईल, असे ते म्हणाले. सावंतवाडीसारख्या ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहराचा अधिक विकास करायचा असेल, तर नागरिकांनी सत्तेसोबत राहणं गरजेचं आहे, असे आवाहन त्यांनी केले.
नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर, ना. नितेश राणे यांनी सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांबाबत ठोस ग्वाही दिली. नागरिकांना दर्जेदार सुविधा आणि चांगले डॉक्टर उपलब्ध करून देण्यावर शासनाचे लक्ष असेल, असे त्यांनी सांगितले.
तसेच, सावंतवाडी शहराला लाभलेल्या ऐतिहासिक वारशाला पर्यटनाच्या माध्यमातून अधिक सुंदर व विकसीत करण्यासाठी साथ द्या,” असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, आमच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांसोबत मी स्वतः तसेच मुख्यमंत्री ही सोबत आहेत. त्यामुळे नागरिकांनी साथ दिल्यास विकास नक्की करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धा भोंसले, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोंसले, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर, शहर मंडल अध्यक्ष तथा स्थानिक उमेदवार सुधीर आडिवरेकर, दुलारी रांगणेकर, सुधीर दळवी, ॲड. संजू शिरोडकर, केतन आजगांवकर आदी उपस्थित होते.
