You are currently viewing सिंधुदुर्गनगरी व कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहांना मंजुरी

सिंधुदुर्गनगरी व कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहांना मंजुरी

आम. निलेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली मंजुर

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सिंधुदुर्गनगरी आणि कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहे उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आमदार निलेश राणे यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केलेल्या मागणीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास आणि भोजनाच्या सोयींचा अभाव जाणवत होता. अनेक हुशार विद्यार्थी या कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहत होते. या गंभीर बाबीची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी दिनांक १३ ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय मंत्र्यांना पत्र सादर करून वसतिगृहांची मागणी केली होती.

या पत्राची सकारात्मक दखल घेत मंत्रालयाने मंजुरी देताना नमूद केले आहे की, नव्या वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, पौष्टिक भोजन, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध होईल. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होऊन त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.

या निर्णयामुळे सिंधुदुर्गनगरी व कुडाळ येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे अधिक व्यापकपणे खुले झाले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा टप्पा ऐतिहासिक मानला जात आहे. मंजुरीनंतर या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच सुरुवात होणार असल्याचेही शासन पत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा