You are currently viewing पालकमंत्री नितेश राणेंच्या धाडीचा प्रभाव – सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर

पालकमंत्री नितेश राणेंच्या धाडीचा प्रभाव – सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर

मटका, जुगार, दारू व नशिले पदार्थांच्या अड्ड्यांवर जिल्हाभर छापेमारी; संशयित आरोपींवर अटक सत्र सुरू

सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकल्याने जिल्हा पोलिस प्रशासन हलले असून जिल्हाभरात ॲक्शन मोड सुरू झाला आहे. या धाडीनंतर जिल्ह्यातील सर्व मटका-जुगार अड्डे तात्काळ बंद करण्यात आले असून दररोज होणारा लाखो रुपयांचा चुराडा या कारवाईमुळे थांबवला गेला आहे.

कणकवलीचे पोलीस निरीक्षक यांचे या प्रकरणात झालेले निलंबन जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचे व कठोर पाऊल ठरले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाया सुरू झाल्या आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत असून यात सहभागी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर अटकसत्र सुरू झाले आहे.

जिल्हाभरात दारू, मटका, जुगार अशा अवैध धंद्यांवर पोलिसांची धडक मोहीम सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी छापेमारी करून कारवाया करण्यात आल्या आहेत. कणकवलीतील घेवारी यांच्या मटका अड्ड्यावर पालकमंत्र्यांनी घातलेली धाड जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर कृत्ये रोखण्यासाठी दिशा देणारी ठरली आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी यापूर्वीच सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले होते की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीर दारू, मटका-जुगार, चरस, गांजा अशा नशिले पदार्थांच्या रॅकेटमुळे भावी पिढी बरबाद होऊ नये. अवैध धंद्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा होत आहे तसेच युवक व समाज यांचे मोठे नुकसान होत असल्याने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आदेश त्यांनी दिले होते. या आदेशानंतर अखेर पोलिसांनी सर्व अशा बेकायदेशीर अड्डे व त्यामागील नेटवर्क मोडण्यासाठी धडक छापेमारी हाती घेतली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडून शनिवारी दिवसभर कारवाया करण्यात आल्या. संशयित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून अटक सत्रही सुरू झाल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी व जिल्ह्याची शांतता अबाधित राखण्यासाठी सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी धडकी भरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा