गोविंद गावडे याने आंबोलीचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले; आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर
आंबोली : आंबोली गावातील कु. गोविंद बाबुराव गावडे याने तबला वादन क्षेत्रात अभूतपूर्व असा नवा विक्रम नोंदवला आहे. आशिया पॅसिफिक ग्लोबल रेकॉर्ड (२२७ देश)मध्ये सलग आठ तास पंचवीस मिनिटे शिव-तांडव स्तोत्रावर तबला वादन करून आपले नाव कोरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी त्याचे विशेष आभार मानले.
गोविंद हा आंबोलीतील गड्डुवाडीचा रहिवासी असून सध्या शिक्षण कोल्हापूर येथे घेत आहे. त्याचे वडील मेनेन अँड मेनन या कंपनीत कार्यरत आहेत. कुटुंबीयांच्या अथक परिश्रमाबरोबरच डॉक्टर कदम सरांचे मार्गदर्शन आणि श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांचे पाठबळ या विक्रमामागे महत्त्वाचे ठरले.
श्रावणी सोमवारी झालेल्या या विक्रम प्रयत्नाला शिक्षणमहर्षी डॉ. साळुंखे सांस्कृतिक भवन हे साक्षीदार ठरले. कार्यक्रमासाठी आधीपासूनच संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. वादनादरम्यान गोविंदच्या चेहऱ्यावर हसरा भाव कायम होता आणि अजून दोन-तीन तास तो सहज वादन करू शकला असता, असे उपस्थितांनी सांगितले.
या विक्रमामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून भारतीय संगीत क्षेत्राला एका नव्या उंचीवर नेण्यात गोविंदचे योगदान अमूल्य ठरले आहे.
या प्रसंगी गावडे कुटुंबीय, गेळे गावचे माजी सरपंच प्रकाश गवस, प्रकाश गावडे, चंद्रकांत गावडे, संजय गावडे, संतोष पालेकर, नाना नाईक कुटुंबीय, श्री नेसरकर, मेनेन अँड मेननचे अधिकारी व कर्मचारी तसेच अनेक मान्यवर व मित्रपरिवार उपस्थित होते.
आंबोलीवासीयांनी या यशाचा अभिमान व्यक्त करत “कु. गोविंद गावडे याने आंबोलीचे नाव जागतिक स्तरावर पोचवले आहे,” असे गौरवोद्गार काढले.
