You are currently viewing पावसाळी रानभाज्या

पावसाळी रानभाज्या

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*पावसाळी रानभाज्या*

 

पावसाळ्यात आपल्याला निसर्गाची विविध रूप पाहावयास मिळतात.. या रूपांपैकी एक रूप ते म्हणजे हिरव्या रंगाच्या विविध छटा असणा-या रानभाज्या.. क्वचितच एखादी लाल शेंदरी नाहितर तपकिरी रंगाची असते.. या भाज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या

रासायनिक खते, कीटकनाशके यांच्याशिवाय आपोआप डोंगरावर

उगवलेल्या असतात.. त्यामुळेच या भाज्यांमधील पौष्टिक गुणधर्मात दुपटीने वाढ होते.. परिणामी या

रानभाज्या विविध आजारांवर विकारांवर गुणकारी ठरतात..

पावसाची रिपरिप सुरू झाली की रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. प्रेमाने, निगुतीने या भाज्या बनवून खातात व खाल्ल्या जातात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी रानभाज्यांचे उत्सवही साजरे ही केले जात आहेत. कुपोषण मुक्तीमध्ये या भाज्यांमधील घटक द्रव्यांचा आवर्जून विचार करायलाच हवा असाही आग्रह वाढत आहे व वाढताना दिसत आहे….

पावसाळी रानभाज्या खाणे हा एक वेगळाच अनुभव असतो…टाकळा, शेवरं, कंटोली,(कंटरोली, कंटोर्ली,) भारंगी, फोडशी, कुळू यांसारख्या अनेक भाज्यांची दर्दी खवय्ये मंडळी वाट पाहत असतात…. जंगलावर उपजीविका करणारे आदिवासी या पावसाळी भाज्या ओळखण्यात पारंगत असतात….

आज आपण कंटोरली याविषयी जाणून घेऊया…

करटुली, कंटोरली, कंटोर्ली विविध नावांनी ओळखली जाणारी ही रानभाजी… करटोली या वनस्पतीला ‘कारटोली’, ‘कंटोली’, ‘रानकारली’, ‘कर्कोटकी’, ‘करटुली़’ अशीही तिची स्थानिक नावे आहेत… या भाजीचा वेल असून ती दुडीप्रमाणेच उगवते. यास काट्यासारखीच फळे येतात. त्याची भाजी बनवतात. ही भाजी रुचकर असते व त्याचा काटेरी भागही शिजतो… करटोला हे लहान वांग्यापेक्षा लहान आकाराचे फळ आहे परंतू चवीला हटके आणि आरोग्यादायी आहेत… पावसाळ्यातील रानभाजीपैकी करटोली ही कारल्याच्या प्रजाती मधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते यामध्ये प्रोटीन, आयर्न घटक मुबलक असतात  तर कॅलरीज अत्यल्प असतात… रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी करटोली गुणकारी आहेत… या फळभाजीमध्ये खूप बिया असतात…

तसेच काही रानभाज्यांविषयीही जाणून घेऊया…

** कुलुची भाजी—पावसाळ्याच्या अगदी पहिल्या सरीनंतर कुलुची भाजी दिसू लागते.. काही दिवसातच ही भाजी तयार होत असल्याने बाजारात सर्वात आधी याच भाजीचं आगमन होतं…

** कुरडू — ही पालेभाजी जातीची असून कुरडू पालेभाजीच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते…

** टाकळयाची भाजी— ही भाजी दिसायला मेथीच्या भाजी सारखीच दिसते… ठाणे मुंबईच्या बाजारात मेथीच्या जुडी सारखी ही भाजी घेता येते.

** दिंडा— ही भाजी पावसाळा संपला की संपते पावसाळ्याच्या पहिल्या सरीबरोबर त्याला नवे कोंब फुटू लागतात आणि पूर्ण वाढ होण्याआधीच तिचे कोंब खुडले जातात. ..ही दिंडाची भाजी खास प्रसिद्ध आहे…

** भारंग— ही भाजी उगवल्यानंतर कोवळी असतानाच तोडली जाते.. भारंगच्या पानांच्या कडा करवतीसारख्या दातांसारख्या असतात…भारंगाची सुकी भाजी विशेष लोकप्रिय आहे…

याशिवाय आणखीनही काही रानभाज आहेत जसे की फोडशी, शेवळं, कुरडू, नालेभाजी, रानातलं अळू, गावठी सुरण, इत्यादी.

या सर्व भाज्या करण्यासाठी अगदी सोप्प्या आणि खायला रुचकर असतात…

पाऊस सुरु झाला की रानभाजांची चंगळ सुरु होते. या रानभाज्या रानोमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. सध्याच्या ऑरगॅनिक फूडच्या जमान्यात वर्षातून एकदाच येणारा हा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने ऑरगॅनिक फूड असतो. कोणतेही खत किंवा कीटकनाशक नाही हेच काय कोणतीही लागवड ही नाही अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच….

निसर्गाने प्रत्येक मोसमात काही फळ आणि भाज्या उपलब्ध करून दिल्या आहेत.. ज्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत म्हणून आपण सुद्धा निसर्गाचा मान राखून मोसमी फळ आणि भाज्यांचा आस्वाद घेतला पाहिजे..

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी— ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा