गुरे रस्त्यावर सोडण्याऐवजी छावणीत पाठवा – फोंडाघाट ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
फोंडाघाट
गुरे रस्त्यावर सोडून देण्याऐवजी त्यांना योग्य देखरेख व आधार मिळावा यासाठी फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भटक्या ढोर जनावरांना दाजीपूर येथील जनावरांच्या छावणीत नेण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काही ग्रामस्थांनी स्वतःच्या वाहनांतून ही जनावरे दाजीपूर गगनगिरी मठ येथील छावणीत नेऊन सोडली. ग्रामपंचायतीमार्फत अशा नागरिकांचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला.
या प्रसंगी हवेली नगर येथील रेवडेकर बंधूंचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांचा सत्कार सरपंच सौ. संजना आग्रे आणि उपसरपंच सौ. तन्वी मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी पुढाकार घेणाऱ्या ग्रामस्थांचे अभिनंदन करत सांगितले, “गुरे ही आपल्या कुटुंबाचा एक भाग असून, त्यांचे संगोपन ही आपली जबाबदारी आहे. जनावरे रस्त्यावर सोडणे टाळा व समाजात चांगला आदर्श प्रस्थापित करा.”
तसेच, नाडकर्णी यांनी पुढे म्हटले की, “गाय ही आपली माता आहे, तिचं संगोपन आणि सुरक्षा ही आपली नैतिक जबाबदारी आहे. असे उपक्रम इतर गावांनीही राबवावेत.”
