दिव्यांग बांधवांसाठी साईकृपा अपंग शक्ती संस्थेचे कार्य कौतुकास्पद…प्रसन्ना देसाई
मठ येथील दिव्यांग बांधवांच्या मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद…
वेंगुर्ले
दिव्यांग बांधवांसाठी सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांनी मठ येथे आयोजित विभागीय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले. दिव्यांग बांधव हे समाजाचा अविभाज्य घटक असून, शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संस्था तळमळीने काम करत असल्याचे देसाई म्हणाले.
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल, सिंधुदुर्ग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायत सभागृहात दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी मठच्या सरपंच सौ. रूपाली नाईक, पालकरवाडीचे सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, ग्रामसेवक वजराठकर, अजित नाईक, शिवराम आरोलकर आणि हरेश वेंगुर्लेकर हे मान्यवर म्हणून उपस्थित होते. या मेळाव्यात सभासद नोंदणी, ऑनलाईन प्रमाणपत्र, रेल्वे पास, पेन्शन योजना, स्वावलंबन कार्ड, शिलाई मशीन, बालसंगोपन, घरघंटी, घरकुल आदी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. कमी दृष्टी, पॅरालिसीस, अपघात यामुळे आलेल्या दिव्यांगांची विशेष नोंदणी करण्यात आली. संस्थेच्या वतीने उपस्थित दिव्यांगांना भेटवस्तू देण्यात आल्या.
या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी साईकृपा संस्थेचे कर्मचारी संजना गावडे, प्रणाली दळवी, विशाखा कासले, हर्षद खरात यांनी विशेष प्रयत्न केले. भविष्यातही ही संस्था दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
