You are currently viewing महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील व्यावसायिक व स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांकरीता ओबीसी महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (विरशैव लिंगायत समाजाकरीता), संत सेनानी महाराज केशशिल्पी महामंडळ (नाभिक समाजाकरीता), संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाजाकरीता) व शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ ( उर्वरीत ओबीसी समाजाकरीता ) या महामंडळांच्या योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना रूपये 15 लक्षपर्यंत ही योजना सुरू असून सन 2025-2026 या वर्षाकरीता उमेदवारांना अर्ज सादर करण्याचे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.  

        योजनेचे स्वरूप :-    ओबीसी महामंडळामार्फत राबविण्यात येणारी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा रूपये 10.00 लक्षवरून रूपये 15.00 लक्षपर्यंत वाढविण्यात आली आहे. इतर मागास बहूजन कल्याण विभागाने दि.14 मे 2025 रोजी शासन निर्णय जारी केलेला आहे. ही योजना ऑनलाईन असून महामंडळाच्या WWW.MSOBCFDC.ORG  या वेबसाईट वरून अर्ज सादर करता येणार आहेत.

लाभार्थी पात्रतेचे निकष व कागदपत्रे :- अर्जदार हा इतर मागासप्रवर्गातील असावा. अर्जदाराकडे तहसिलदार यांच्याकडून प्राप्त झालेला ओबीसी प्रवर्गाचा दाखला असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे पर्यंत असावे. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू.8.00 लक्षच्या मर्यादेत ( तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला) असावे . महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला (वय अधिवास प्रमाणपत्र), अर्जदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाबाबत आवश्यक असलेले कागदपत्रे इ. तसेच महामंडळाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे, जिल्हा कार्यालयाकडे अर्ज ऑनलाईन अर्जासोबत सादर करावी.

कर्ज योजनेमधून करता येऊ शकणारे व्यवसाय :- महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या सहाय्याने अर्जदार कृषी संलग्न व पारंपारीक उपक्रम, लघुउद्योग, मध्यम उद्योग, उत्पादन प्रक्रियामधील असणारे व्यवसाय, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसाय किंवा कायदेशीररित्या सुरू करता येऊ शकणारा कोणताही व्यवसायकरीता अर्जदार अर्ज सादर करू शकतात.

        वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थींनी वेबपार्टल वर अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराला  LOI (पात्रता प्रमाणपत्र) प्राप्त होते. या प्रमाणपत्राचा कालावधी 6 महिन्यांचा असून लाभार्थीने बँकेकडून मुदतीत कर्ज मंजूर करणे आवश्यक आहे. कर्जमंजूरी व कर्ज वाटप झाल्यानंतर लाभार्थीने बँकेकडे नियमित हप्त्यांची रक्कम भरणा करून दरमहा ऑनलाईन पध्दतीने क्लेम केल्यानंतर व्याजाची परतावाची (12 टक्के च्या मर्यादेत ) रक्कम लाभार्थीच्या आधारलिंक बँक खात्यात दरमहा महामंडळाकडून जमा करण्यात येईल.

        योजनेकरीता जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज सादर करावे व योजनेचा लाभ घ्यावा याकरीता अधिक माहितीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सिंधुदुर्गनगरी ,तालुका कुडाळ , जिल्हा सिंधुदुर्ग याठिकाणी भेट देवून अथवा कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02362 228119 या क्रमांकावर संपर्क साधवा.

प्रतिक्रिया व्यक्त करा