*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम लेख*
*आजचे विद्यार्थी…*
आठवतंय का… आयुर्वेदिक गर्भसंस्कार पुस्तक..? का बरे बालाजी तांबे यांना ते पुस्तक लिहावेसे वाटले..? धंदा, व्यवसाय करणे एवढाच त्यांचा उद्देश नक्कीच नसेल तर आपल्या भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यानुसार गर्भावस्थेपासूनच बाळावर संस्कार केले जातात हे सिद्ध ही झाले आहे… म्हणजेच मुलांवर संस्कार होतात ते ती गर्भात असल्यापासून..!
आजच्या नव्या पिढीला माहिती आहे का..गर्भसंस्कार म्हणजे काय..? किती जणी वाचतात गर्भसंस्कार आणि संस्कार करण्याचे प्रयत्न करतात..? पापण्या उघडल्यापासून मिटेपर्यंत जर मोबाईल वर डोळे फोडले, कानांचे पडदे फाटेपर्यंत कानात बोळे कोंबून संगीत ऐकलं, सिनेमे पाहिले की होतील का सुयोग्य गर्भसंस्कार जन्मास येणाऱ्या मुलांवर..? आज अनेक स्त्रिया गर्भसंस्कार करण्यास विसरल्या आणि तिथूनच भावी पिढीचा प्रवास विस्कळित होत चालला असे म्हणण्यास वाव आहे. “आम्हाला बाई एकच मूल पुरे, कोणाला जमतंय आता दोघा दोघांचं करायला..!” इथूनच आपल्या माणसांचं करायला आपणच असहाय, असमर्थ आहोत हा संस्कार रुजू होत जातो आणि पुढे सांगायलाच नको मुले मोठी होऊन काय करतात ते…!
“हम दो, हमारे दो ” वरून “हम दो हमारा एक” या मानसिकतेत आलेली समाज व्यवस्था असताना पालक जेव्हा लाडका असलेल्या बाळासाठी आयुष्यातील अमूल्य वेळ देऊन त्यावर सुयोग्य संस्कार करतात तेव्हा नक्कीच आजचा बालक भविष्यातील आदर्श विद्यार्थी म्हणून गणला जातो..
मुलांना घरी उच्चार शिकविण्यापासून शाळेत दाखल करण्यापर्यंत केवळ पालक संस्कार करतात नंतर सुरू होतात गुरूंचे संस्कार..! मुलांना कुठल्या माध्यमात शिकवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. इंग्रजी माध्यमातून शिकविणे अयोग्य नव्हे, पुढील आव्हानांचा विचार केल्यावर ते योग्यच आहे असे प्रथमदर्शनी दिसते. परंतु माझ्यामते हा केवळ आभास आहे. मातृभाषेतून शिक्षण घेऊन गरजेपुरत्या इतर भाषा आत्मसात करून दुनियेतील आव्हानांना सामोरी जाणारे मुले जीवनाच्या सागरात सहज तरुन जातात..भविष्यात यशस्वी सुद्धा होतात..शालेय बोर्ड असो की महाविद्यालयीन पदवी परीक्षा.. इंजिनीअरिंग की, मेडिकल पदवी तीच मुले पुढे येतात ज्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेण्याची मुभा दिले जाते..
पण, कित्येकदा पालकांची मानसिकताच मुलांच्या भविष्याच्या आड येते आणि जिथे जास्तीतजास्त पैसे भरून शिकविले जाते तीच शाळा मुलांसाठी योग्य असा समज (गैर) करून घेतात आणि नको तेवढे ओझे पाठीवर लादून सोडून दिले जाते मुलांना अनावश्यक अभ्यासाची ओझी वाहण्यासाठी.. त्यांची आवड निवड न पाहता आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबले जाते प्रत्येकवेळी अन् मग काहीवेळा अपयशाला सामोरे जावे लागते..पालकांची जबरदस्ती असते परंतु दोष मुलांना दिला जातो. मुलांची मानसिकता बदलते आणि तिथून आजचा विद्यार्थी मागे पडत जातो.. शालेय शिक्षण संपताच त्यांना पाठविले त्यांचा कल नसलेल्या पालकांच्या आवडत्या क्षेत्रात जबरदस्तीने.. माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर होणार हे तेच ठरवतात अन् त्याचे आवडते क्षेत्र सहज दुर्लक्षित करतात आपल्या अनावश्यक इच्छेपोटी.. मग विद्यार्थी बनतात सर्वांसारखीच कारखान्यात तयार होऊन येणारी मशिन..बटण दाबले की सुरू आणि वीज गेली की बंद..! नोकरीच्या शोधात संपते अर्धेअधिक आयुष्य.. नि स्थिरस्थावर होईपर्यंत तारुण्य..! त्यामुळे आजचे विद्यार्थी बऱ्याचदा दिशा भरकटतात आणि अयोग्य दिशेने वाटचाल करू लागतात.
आजकाल अनेक विद्यार्थी असे ही आहेत जे आपण भले अन् आपला अभ्यास..!
त्यांच्यावर संस्कारच तसे झालेले असतात किंवा परिस्थितीतून ते शिकलेले असतात. आपण भविष्यात काय बनायचे..? काय करायचे..? हे स्वतःच ठरवून ठेवतात आणि त्या दिशेने सुरुवातीपासून आपला प्रवास सुरू करतात. खेळ, मोबाईल, छंद सारे काही जोपासतात पण, मर्यादित स्वरूपात. त्यांचे उद्दिष्ट, लक्ष्य ठरलेले असते. दिवसातून किती तास अभ्यास करायचा..किती वेळ खेळायचं, फिरायचं सर्व नियोजनबद्ध करतात. इंटरनेट, सोशल मिडिया आदींच्या माध्यमातून स्वतःच माहिती गोळा करतात. वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी लागणारी पुस्तके, मार्गदर्शन आदी घेत स्पर्धा परीक्षा देण्याबाबत सजग असतात. त्यांच्यावर पालकांना कधीही पहारा ठेवावा लागत नाही…आणि त्यांच्या प्रयत्नांच्या आड परिस्थिती सुद्धा येत नाही. कधी कधी अभ्यासातील किडे म्हणून हिणवले जातात परंतु उच्चपदावर पोचण्यासाठी जे जे कष्ट घ्यावे लागतात ते घेऊन ते यशोशिखर गाठतात. मानसन्मान स्वतः मिळवतात आणि आपल्या आईवडिलांना देखील सन्मान प्राप्त करून देतात.
विद्यार्थी दशेतील असाही एक वर्ग आहे जो सर्वसामान्य कुटुंबातून येतो. आपल्याला मिळणारं पाठबळ, आपल्या मर्यादा जाणून असतो. शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर बुद्धिमत्ता चाचणी, स्कॉलरशिप, गणित संबोध अशा परीक्षांकडे साफ दुर्लक्ष करतो. त्या परीक्षांमधून काहीच साध्य होत नाही असा त्याचा होरा असतो. त्याचा स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास असतो आणि तीच बुद्धी वापरून तो आवश्यकतेनुसार शिक्षण घेतो. हुशार विद्यार्थी म्हणून नावाजला जातो.. वायफळ खर्च, उनाडक्या हे त्याच्या आसपास सुद्धा फिरकत नाही…परंतु घरची गरज ओळखून शिक्षण पूर्ण होताच व्यवसाय, नोकरी पत्करतो. आपल्यातील सजगता जगाला दाखवतो.
विद्यार्थ्यांमध्ये एक स्वच्छंदी घटक सुद्धा आहे जो घरचे सुसंस्कार कधीच विसरतो अन् समाजातील, मित्रांमधील कुसंस्कार आपलेसे करतो.. संगतीने बिघडलेला हा विद्यार्थी, विद्यार्थीदशेतच व्यसने, वाममार्ग, स्वैराचार सर्वांना कट्टर मित्र बनवतो.. वरवर खूपच साधा दिसणारा हा विद्यार्थी बऱ्याचदा व्यसनांमुळे, त्याच्या कृत्यांमुळे बदनाम होतो.. घरातील वंशाचा दिवा असे बिरूद लावून लाडका, लाडका म्हणून घरात बालपणापासून झालेले लाड, पुरविलेले बालहट्ट यामुळे शालेय जीवनातून बाहेर पडताच महाविद्यालयात आपली एक वेगळी ओळख निर्माण करतो. रावडी, टपोरी, वाया गेलेली पोरं, चांडाळ चौकडी अशी विशेषणे नावाच्या आधी जोडली जातात.. हे विद्यार्थी १००% भविष्यात वाईट ठरतात असे नव्हे कित्येकदा यशाचे शिखरही गाठतात परंतु..त्यांचा प्रवास काहीसा भरकटतो कारण त्यांना मिळालेले मार्गदर्शन, संस्कार अपुरे ठरतात, काहीवेळा संगत बाधते..संगतीमुळे त्यांची दिशा चुकते पण वेळ येताच बरेच जण सुधारतात देखील..!
आजचा विद्यार्थी कधी कधी अनावश्यक बोझ्याने गोंधळतो, दिशा चुकल्यावर धडपडतो पण आधाराचा हात मिळताच सावरतो.. नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा बाळगतो.. तो जिद्द न हरता जीवनातली सर्व आव्हाने पेलतो.. अपयशाने खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उंच भरारी घेत पुन्हा एकदा आसमानाला स्पर्श करण्याची स्वप्ने पातो…तो प्रचंड आशावादी जीवन जगतो..
चुकला, धडपडला तरी आजचा विद्यार्थी स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहतो..
🖋️दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
