सावंतवाडी
तळवडे खेरवाडी येथे शॉर्टसर्किट झाल्यामुळे शेतमांगराला आग लागली. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत मांगराच्या छपरासह आतील सामान जळून खाक झाल्यामुळे शेतकरी उत्तम भगवान परब यांचे लाखोंचे नुकसान झाले.दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर सावंतवाडी पालिकेच्या अग्निशमन बंबाला संपर्क केल्यानंतर काही वेळाने कंब त्याठिकाणी दाखल झाला. बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य दादा परब यांनी दिली.
याबाबतची माहिती अशी की, बुधवारी सकाळच्या सुमारास परब यांच्या शेत मांगरात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. पावसाच्या पूर्वतयारीसाठी या शेतमंगात जळाऊ लाकूडसामान भरलेले असल्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. त्यात आतील सामानासह मांगराचे छप्पर जळून खाक झाले.याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आग विझविण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.तसेच ग्रामपंचायत सदस्य देखील मदतीसाठी त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र, आग आटोक्यात येत नसल्यामुळे तात्काळ सावंतवाडी पालिकेचा अग्निशमन बंब त्या ठिकाणी पाचरण करण्यात आला.भर पावसाळ्यात हा प्रकार घडल्यामुळे परब कुटुंबासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल विभागाकडून तसेच महावितरण कडून पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परब कुटुंबीयांनी केली आहे.