डॉ.सारंग यांची बदली रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन – बाबुराव धुरी
दोडामार्ग
साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गेल्या १० वर्षांहून अधिक काळ रुग्णांना अविरत सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांची झालेली बदली ही दुर्दैवी बाब आहे, असे मत ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. या बदलीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा धुरी यांनी दिला आहे.
धुरी यांनी दिलेल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वैद्यकीय साटेली-भेडशी आरोग्य केंद्रात डॉ. सारंग हे मागील १० वर्षे रुग्णांना अविरत आरोग्य सेवा देत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली-भेडशी अंतर्गत परिसरातील ३० ते ३५ गावे आरोग्य सेवेकरिता या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असून डॉ. सारंग हे येथील रुग्णांना रात्री-अपरात्री २४ तास चांगल्या सेवा देण्याचे काम करत असताना त्यांची बदली करणे हे शासनाचे दुर्दैव आहे.
सिंधुदुर्गात डॉक्टर मिळत नाहीत, अशी ओरड असताना चांगल्या काम करणाऱ्या डॉक्टरांची बदली केल्यास दोडामार्गमधील संपूर्ण जनतेच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असे धुरी यांनी म्हटले आहे