बांदा
जीवन प्राधिकरण विभागाच्या बांदा-आळवाडी येथे जलवाहिनी वाहून नेण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुलाची आज बांदा व शेर्ले येथील लोकप्रतिनिधिनी पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी तात्काळ पुलाच्या जोडरस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना बांदा सरपंच अपेक्षा नाईक व उपसरपंच जावेद खतीब यांनी ठेकेदारांना दिल्यात.
सासोली (ता. दोडामार्ग) येथून वेंगुर्ले येथे जीवन प्राधिकरण विभागाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. बांदा शहरातून आळवाडी येथील तेरेखोल नदीपात्रात जलवाहिनी नेण्यासाठी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. मडुरा, शेर्ले दशक्रोशीतून बांदा शहरात येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने दशक्रोशीतील हजारो नागरिक, शालेय विद्यार्थी याईला मार्गाचा वापर करतात. पुलामुळे नदीपात्रातील जीवघेणा होडी प्रवास थांबला आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूला जोडरस्त्याचे काम अपूर्ण होते. त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक ठरत होते.
यासंदर्भात बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी वेळोवेळी जीवन प्राधिकरण विभागाचे लक्ष वेधले होते. तसेच पावसाळ्यापूर्वी जोड रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला होता. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी जोड रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. आज बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, उपसरपंच शामराव सावंत यांच्यासह राकेश केसरकर, सुनील धामापूरकर, शैलेश केसरकर, ईला आळवे यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी जीवन प्राधिकरण विभागाचे अमित शंभुशेठ व प्रकाश शेलार हे अधिकारी उपस्थित होते.
पुलाच्या जोड रस्त्यासाठी मातीचा भराव वाढविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दोन वाहनांना ये – जा करण्यासाठी रस्त्याची रुंदी वाढविण्याची मागणी उपसरपंच खतीब यांनी केली. पाऊस तोंडावर आल्याने दिवसरात्र काम करून रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.