*लेखिका तथा ग्रामीण पत्रकार मेघा कुलकर्णी “मेघनुश्री” लिखित अप्रतिम लेख*
*सावली*
हा शब्दच मनांला थंडावा, गारवा देणारा. कोणत्याही ऋतुत आनंद निर्माण करणारा. कडकडीत उन्हातही एखादा मेघ थोडा वेळ हे शांत दृश्य निर्माण करतो. सध्या सगळीकडेच तापमान वाढत चालले आहे, पर्जन्य हुलकावणी देत आहे. पावसाची वाट शेतकरी बंधू सोबत सगळेजण पहात आहोत. प्रवासांतही याची अनेकदा जाणीव होत असते, विशेषतः ग्रामीण भागांत एखादा डेरेदार वृक्ष त्याच्या सावलीत मनुष्य विसावत असतो. ऊन ‘मी’ म्हणत असताना विक्रेता दुपारचे जेवण याच सावलीत करत असतो. सदनिका, कार्यालय व इतरत्र सगळीकडे असलेले वृक्ष किंवा छोटी झाडे नैसर्गिकतेत भर घालतात. विचार करता हे लक्षांत येते की, त्यांची जागा, ठिकाण कधीच बदलत नाही. मनुष्य, प्राणी, पक्षी सर्वचजण इकडून तिकडे येतात जातात. वृक्ष आपण जिथे लावतो तिथेच उभे असतात, वाढतातही. पानगळीचा हंगाम सोडता रोज नजरेस सुख देणारे हिरवेपण आपल्याला देत रहातात. फळे, फुले यांची निर्मिती नित्यनेमाने करत कधी सुगंधीत तर कधी सुशोभित विविध पुष्पातून भावविश्व साकारत असतात.
खरे तर सावली अनेक प्रकारे मिळू शकते उदा : छत्री, टोपी, छत या सगळ्यासाठी आपल्याला हलत रहावे लागते तरच त्याचा उपयोग योग्य प्रकारे होऊ शकतो असे म्हणावे लागेल. वृक्ष मात्र सर्वच ऋतू अंगावर झेलून वारे वाहतील तसे हलत रहातात. बसल्या जागी माणसाला दिवस/रात्रीच्या कोणत्याही प्रहरी हे सुख अनुभवता येते. ते वारे घालतात पण बिल आकारत नाहीत. सावलीत उभ्या असलेल्या लोकांना “आता बाजूला व्हां बरे, कामाची वेळ संपली आहे, जेवणाची सुट्टी झाली आहे, नंतर वारे घालतो किंवा नंतर हवा मिळेल” असे सांगत नाहीत. निसर्गाचा हा अनमोल ठेवा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे ही लक्षांत घेण्यासारखी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वृक्षलागवड करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही. अनेक व्यक्ती, संस्था आज या कार्यात अग्रेसर आहेत. तरीही सुसंस्कारीत नागरिक म्हणून मनापासून हे कार्य प्रतिमनुष्य झाले तर उन्हाळा हा ऋतूही त्याच्या वैशिष्ट्यांसह सुखकारक होईल यांत तिळमात्र शंका नाही.
जशी घरची वृद्धमंडळी असतील तर जीवनास एक शिस्त रहाते तसेच वृक्षवल्ली सोबत असेल तर आपल्या पिढीसोबत पुढील पिढीही निश्चितच समृद्ध होईल. नैसर्गिक आपत्तीत वृक्ष उन्मळून पडतात, पण ती जागा खरेतर दुसऱ्या वृक्षानेच भरून काढली जावी असे मनोमन वाटले पाहिजे. तोंडावर असणारा पावसाळा नववृक्ष लागवडीस अत्यंत उपयुक्त म्हणूनच हे विचार आपोआप कागदावर अवतरले. खूप वेळां संभाषणातून असेही जाणवत रहाते की, सर्व काही असूनही शांततेच्या शोधांत मैलोनमैल माणूस प्रवास करत असतो. गाडी मध्येच थांबवण्यासाठी एखाद्या वृक्षाची सावली शोधत असतो. हे दृश्य पहाताच आजही आपण निसर्गाच्या जवळ आहोत याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. प्रगतीपथावर सावलीची किमया अघाध आहेच, फक्त तिची किंमत ओळखता आली पाहिजे. कौटुंबिक छत्रछायेत सुखाने नांदण्यात जी आत्मियता असते तीच या नैसर्गिक संपत्तीबद्दल असली पाहिजे. अनेक समारंभातून भेट मिळणाऱ्या वृक्षांसोबत स्वतःहून भर घातली तर काहीच नुकसान होणार नाही. पाणी घालताच टवटवीत दिसणारी रोपे मनांस केवढा मोठा आनंद देतात.
ग्रीष्माची चाहूल लागली की मग सावली शोधत वणवण फिरणे हे टाळायचे असेल तर सामाजिक स्तरावरच नाही तर व्यक्तिगत पातळीवर या कार्याची सुरवांत करणे कधीही लाभदायक असेल. मुबलक आणि नि:शुल्क मिळणारा गार वारा थांबला की किती काहिली होते ? पंख्याचे गरगर फिरणेही परके वाटू लागते. भारनियमांत ग्रामीण भागांतील वीज गेली की हा बहरलेला निसर्गच मदतीला धावतो. गार हवा तर एसी आणि कुलर ही अत्याधुनिक यंत्रे नक्कीच देऊ शकतात, पण त्यांच्या ठिकाणाहून बाहेर पडत असतानाच उन्हाच्या झळा मात्र जास्तच अंगाला जाणवू लागतात. काही क्षण सोबत असणाऱ्या या सोयींनी सुख नक्कीच मिळते ते नाकारता येणार नाही. वर्षानुवर्षे लाभत असलेली नैसर्गिक संपत्ती जपता आली पाहिजे.
प्रवासांत असताना प्रत्येकजण आजही खिडकीशेजारची जागा मिळावी म्हणून धडपडत असतो, कारण का तर बाहेरचा निसर्ग त्याला साद घालत असतो. इतर गोष्टी जशा जीवनांत प्रतिष्ठेच्या आहेत तशीच वृक्षलागवड आणि त्यांपासून मिळणारी सावली हेही प्रतिष्ठेचे झाले पाहिजे. “हिरवा निसर्ग हा भवतीने” हे गीत गुणगुणताना जसा मनांत निसर्ग फुलतो तसाच आसपासचा परिसर, उघडे-बोडके डोंगर बहरले तर क्षणोक्षणी ‘सावली’ जिथे तिथे मिळेलच, ऊन सावलीचा खेळ तर सदैव नयनरम्यच असतो.
मेघनुश्री – लेखिका, ग्रामीण पत्रकार
भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२