दोडामार्ग तालुक्यात बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या कृष्णकांत गवस याची शैक्षणिक जबाबदारी उचलत घेतले दत्तक
तर तालुक्यातून दरवर्षी २ विद्यार्थी आय पी एस होण्यासाठी करणार सुशीला ट्रस्ट मधुन मदत
दोडामार्ग
तो १२ वी च्या परिक्षेत तालुक्यात प्रथम आला तर जिल्ह्यात पाचवा मात्र परिस्थिती बेताची, आय पी एस व्हायचे स्वप्न मात्र त्यासाठी आर्थिक विवंचनेत असणाऱ्या सोनावल येथील कृष्णकांत गवस याची ही काळजी मिटली असून त्याच्या मदतीला दोडामार्ग मधील प्रतिथयश उद्योजक विवेकानंद नाईक धावून आले असून त्यांनी कृष्णकांत याची शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बारावीच्या परीक्षेत दोडामार्ग तालुक्यातून प्रथम आलेल्या कृष्णकांत गवस याला आयपीएस बनायचे आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तो आपले स्वप्न पूर्ण करून शकत नसल्याने त्याच्या या आयपीएस पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत त्याला दत्तक घेतल्याचे प्रतिथयश उद्योजक विवेकानंद नाईक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलंय. इतकचं नव्हे तर ते आता दरवर्षी दोडामार्ग तालुक्यातून अश्या दोन विद्यार्थ्याची जबाबदारी उचलणार असून तालुक्यातून आय ए एस आणि आयपीएस अधिकारी घडविण्याचा आणि त्यांचेकडून देशसेवा करून घेण्याचा त्यांनी प्रेरणादायी संकल्प हाती घेतला आहे.
प्रसिध्द उद्योजक विवेकानंद नाईक यांनी आज आपल्या निवास्थानी वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद घेऊन या मागचा हेतू स्पस्ट केला. ते म्हणाले दोडामार्ग तालुक्यात कुशल बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी आहेत. अफाट बौद्धिक क्षमता त्यांच्याजवळ आहे. याची प्रचिती मला कृष्णकांत गवस याच्याशी संवाद साधताना आली. बारावीच्या परीक्षेत त्याने उज्वल यश संपादन केल्याचे वृत्त प्रसिद्धी माध्यमातून समजले. त्यानंतर त्याला व त्याच्या आईला घरी बोलावून त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना काळात त्याचे वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर घराची जबाबदारी त्याच्यावर आली. आई आणि कृष्णकांत दोघेही आपला प्रपंच काटकसरीने चालवत आहेत. बालवयातच घराची जबाबदारी खांद्यावर पडली तरीही कृष्णकांत डगमगला नाही. घरातील प्रपंच करताना उच्च शिक्षण घेण्याची जिद्द त्याने सोडली नाही. शिक्षण घेत असताना घरातील व शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी तो काम देखील करायचा. त्याची ती जिद्द मेहनत वखडण्या जोगी आहे. त्याच्याशी बराच संवाद साधला. त्याला काय बनायचे आहे. त्याची मनस्थिती काय आहे. तो दृढ निश्चयी आहे का ? याची साधारण माहिती करून घेतली. त्याला काही प्रश्न विचारले असता त्यांची त्याने समाधान कारक उत्तरे दिलीत. त्याच्या बोलण्यातुन त्याचा प्रामाणिकपणा जाणवत होता. त्याचे आदरपूर्वक बोलणे, समजून उमजून उत्तरे देण्याची पद्धत यातून त्याची कुशाग्र बुद्धीमत्ता दिसून आली. त्यावेळी त्याच्या आईला सांगितले की, कृष्णकांतचे आयपीएस होण्याचे स्वप्न आहे. ते त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पुढाकार घेतो आहे. आयपीएस पूर्ण करण्यापर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. त्याचे स्वप्न साकार करण्याची माझ्यावर आहे. असे सांगून मी कृष्णकांतची पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. दोडामार्ग तालुक्यतून त्याला पहिला आयपीएस अधिकारी बनविणारा असल्याचा संकल्प विवेकानंद नाईक यांनी केला आहे.
दरवर्षी दोन विद्यार्थ्यांची आयपीएसची जबाबदारी
विवेकानंद नाईक कृष्णकांत या एकाच विद्यार्थीवर थांबले नाहीत. त्यांना तालुक्यातून अशे अनेक आयपीएस विद्यार्थी घडवायचे आहेत. ते म्हणतात तालुक्यात अशे अनेक विद्यार्थी आहेत. जे ज्यांच्याकडे बौद्धिक क्षमता अफाट आहे. परंतु, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना इच्छे प्रमाणे शिक्षण घेत येत नाही, अश्या वर्षाला दोन विद्यार्थीची जबाबदारी मी घेणार आहे. आणि, तो माझा संकल्प आहे. देशसेवेसाठी झटणारे अशे आयपीएस अधिकारी घडवण्याचे माझे स्वप्न आहे. आणि ते मी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दहावी बारावी विद्यार्थ्यांचा होणार सत्कार
दहावी बारावी परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार विवेकानंद नाईक करणार आहेत. तालुक्यातील सर्व शाळांमधील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा तालुका वर्धापन दिनाचे औचित्त साधून २७ जून रोजी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा सत्कार सोहळा दोडामार्ग पत्रकार समिती व विवेकानंद नाईक यांच्या ट्रस्ट मार्फत संयुक्त रित्या करण्यात येणार आहे. तसेच याचवेळी दोडामार्ग पत्रकार समितीच्या वतीने पत्रकारांना पत्रकार पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.