You are currently viewing वीज प्रश्नी वायरी ग्रामस्थांची मालवण वीज कार्यालयावर धडक

वीज प्रश्नी वायरी ग्रामस्थांची मालवण वीज कार्यालयावर धडक

मालवण

वायरी-भुतनाथ गावात कमी दाबाचा व सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ त्रस्त बनले आहेत. वीज वितरण कडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी मालवण वीज कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांसमोर वीज समस्यांचा पाढा वाचला.

दरम्यान, ट्रान्सफार्मर बाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच अन्य वीज समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी कार्यवाही केली जाईल. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून समस्या सोडवल्या जातील. अशी ग्वाही मालवण कार्यालय वीज अधिकारी गणेश साखरे यांनी ग्रामस्थांना दिली.

वायरी भूतनाथ, मोरेश्वरवाडी, जाधववाडी, रेवंडकरवाडी व परिसरात अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होतो. १०० केवी क्षमतेचा ट्रान्सफार्मर आहे तो क्षमता वाढवून २०० केवी क्षमतेचा मिळावा ही दोन वर्षे पासून मागणी केली जात आहे. ग्रामस्थांनी ट्रान्सफार्मर साठी जागाही उपलब्ध करून दिली तरीही तो उपल्बध केला जात नाही. यासह शिवाजी पुतळा व रेकोबा देवस्थान याठिकाणी ट्रान्सफार्मर क्षमता वाढवून द्या अथवा नवीन ट्रान्सफार्मर द्या. या मागणीचीही दखल घेतली जात नाही. ज्या गावात जागा नाहीत तिथे ट्रान्सफार्मर मंजूर केले जातात आणि जागे अभावी रखडतात मात्र आम्ही जागा द्यायला तयार असताना मिळत नाही. अश्या अनेक समस्या मांडताना ग्रामस्थांचा उद्रेक झाला. वीज समस्यांमुळे गावातील पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच ग्रामस्थांची घरगुती वीज उपकरणेही कमी दाबाच्या वीजपुरवठामुळे नादुरुस्त बनली आहेत. असेही ग्रामस्थांनी सांगितले.

वायरी उभाटकर वाडी येथील ट्रान्सफार्मर वायरी हद्दीत आहे. मात्र त्यावर वीज लोड तारकर्लीचा देण्यात आला आहे. तरी तो बदलण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली. तसेच वीज वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. ती तोडण्याबाबत लवकर कार्यवाही व्हावी. अन्यथा वारा व पावसात समस्या निर्माण होणार आहेत. असेही यावेळी सांगताना वीज प्रश्नांबाबत विविध निवेदने अधिकाऱ्यांना देण्यात आली.

यावेळी सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच प्राची माणगांवकर, भाई मांजरेकर, मंदार लुडबे, प्रकाश डिचोलकर, विकास मसुरकर, पांडुरंग मायनाक, चंदना प्रभू, गौरी जोशी, ममता तळगावकर, तेजस लुडबे, अरुण तळगावकर, बाबा मोरजकर, मिलिंद झाड, संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, मुन्ना झाड, दिलीप घारे यासह ग्रामस्थ, पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा