आत्मनिर्भर व महासत्ता भारत बनविण्यासाठी योगदान द्या : नारायण राणे
सावंतवाडी :
निसर्गरम्य कोकणचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास व्हावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. मात्र, त्याच बरोबर तळ कोकणातील या जिल्ह्याचा औद्योगिक दृष्ट्या ही गतिमान विकास व्हावा यासाठी एमएसएमईच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कालच सह्याद्रीवर बैठक झाली असून त्यांनीही यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या ५३ योजना राबवून व या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना योजना उपलब्ध करून सर्वांचं उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. या माध्यमातून कोकणातील विशेष करून तळ कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचा गतिमान विकास होईल येथील दरडोई उत्पन्न वाढवलं जाईल. त्यासाठी नवनवीन उद्योग उभारून आत्मनिर्भर भारत आणि महासत्ता भारत बनविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हाती घेतलेल्या कार्याला आपण सर्वांनी योगदान देऊया, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
सावंतवाडी येथील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांबाबत माहिती दिली.
आतापर्यंत जो काही कोकणचा विकास झाला आहे त्यामध्ये चीपी विमानतळ, मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण तसेच रेल्वेच्या अनेक गाड्या त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा व पर्यटनासाठी आवश्यक सर्व गोष्टी आपण पूर्ण केल्या आहेत. भविष्यातही निसर्गरम्य कोकणच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाचं प्रमुख स्थळ व्हावं यासाठी आपले प्रयत्न राहतील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
आपल्या एमएसएमई खात्याच्या माध्यमातून राज्यात व विशेष करून कोकणात विविध रोजगाराचे प्रकल्प आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून मुख्यमंत्री देखील त्यासाठी सकारात्मक आहेत. नवनवीन उद्योग उभारून येथे रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
दोडामार्ग एमआयडीसी मध्ये यापूर्वीच जागा संपादित करण्यात आल्या असून लवकरच तेथे कारखानदारी येईल व रोजगार उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या प्रास्ताविकात सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आवश्यक योजना व त्यासाठी लागणारा निधीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री त्या योजनांना निधी उपलब्ध करून देतील हा मला विश्वास आहे. या जिल्ह्यात उद्योग यावेत, तरूणांना रोजगार मिळाला अशी मागणी केसरकर यांनी केली. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ही मागणी देखील पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.