You are currently viewing माझी वसुंधरा अभियानामध्ये वेंगुर्ला नगरपरिषद कोकण विभागात प्रथम

माझी वसुंधरा अभियानामध्ये वेंगुर्ला नगरपरिषद कोकण विभागात प्रथम

तर राज्यात दहावी; एक कोटींचे बक्षिस पटकाविले…

वेंगुर्ला

वेंगुर्ला नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान तिसरे पर्व (२०२३) मध्ये कोकण विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकासहीत १ कोटी रुपयांचे बक्षिस पटकाविले आहे. तर राज्यात दहावा क्रमांक आला आहे. या क्रमांकामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत हे माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले होते. सदर अभियानाचे फिल्ड मुल्यमापन एका कमिटीमार्फत मे २०२३ ला करण्यात आले होते. त्यात पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश आदी निकष लावण्यात आले होते. वेंगुर्ला नगरपरिषदेने भूमी या निकषाखाली केलेली वृक्ष लागवड, वायू या निकषागाली केलेले हवेतील प्रदूषण, प्रदूषणकारी घटकांचे नियंत्रण, जल निकषाखाली जल प्रदूषण टाळणे, वेंगुर्ला शहराला पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणा-या निशाण तलावातील पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण् व पुर्नजिवन, पाण्याचे लेखापरिक्षण, अग्नी या निकषाखाली नगरपरिषद इमारतीच्या छतावर सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे, नगरपरिषद इमारती व सुविधा उर्जा लेखा परिक्षण करुन उर्जा बचतीसाठी प्रयत्न करणे, अपारंपारिक उर्जा स्त्रोताचा विकास करणे, इलेक्ट्राॅनिक वाहनांसाठी सोईसुविधा निर्माण करणे, आकाश निकषाखाली ३ लेस पूर्तता, माझी वसुंधरा जनजागृती व्हावी यासाटी खर्डेकर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय पाणथळ दिवस कार्यशाळा घेणे, शहरात आढळणारी जैवविविधतेची माहिती दर्शविणारी भित्तिचित्रे व वैज्ञानिक माहिती, स्वच्छता उत्सव घेवून त्यात निबंध, चित्रकला स्पर्धा घेवून माझी वसुंधरा कार्यक्रमास प्रोत्साहन देणे, शहरात पर्यावरण दूत नेमणे, हरित क्षेत्रांची निर्मिती व संवर्धन करणे आदी उपक्रम वेंगुर्ला नगरपरिषदेने या अभियानातंर्गत राबविल्याने नगरपरिषदेला ७६०० गुण मिळाले असून ही नगरपरिषद कोकण विभागात प्रथम व राज्यात दहावी आली आहे

१ कोटी रकमेपैकी ५० टक्के रक्कम हरितक्षेत्र वाढविण्यासाटी व उर्वरित ५० टक्के रक्कम पर्यावरण पूरक व इतर उपाय योजनासाटी वापरण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा