कुडाळ हायस्कूल पटांगणावरील कार्यक्रमाच्या पुर्वतयारीची मान्यवरांकडून पाहणी.
कुडाळ
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवार, ६ जून रोजी सिंधुदुर्गात येत आहे. यावेळी कुडाळ येथे हा कार्यक्रम पार पडणार असून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजप नेते निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, उपतालुका प्रमुख अरविंद करलकर यांनी कुडाळ हायस्कूल मैदान या कार्यक्रमस्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच याबद्दल इव्हेंट कंपनीला आवश्यक त्या सूचना केल्या. तत्पूर्वी कुडाळ पंचायत समिती येथे प्रशासकीय बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्य उपस्थिती असेल. ‘शासन आपल्या दारी’ या योजना जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हयातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. तर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले कि, सरकार तळागाळातील सर्वसामान्यांचे सरकार आहे हे दाखवून देण्याच काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांमध्ये होत आहे. शेतकरी , कष्टकरी तसेच सर्व बाराबलुतेदार यांना या सरकारच्या योजनांचा लाभ कसा होइल यासाठी हे सरकार प्रयत्नशिल आहे. आहे. जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे त्याच्याच अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.