इचलकरंजी : प्रतिनिधी
पं. राहुल देशपांडे, इंद्राणी मुखर्जी यांचे बहारदार शास्त्रीय गायन आणि पं. सुधांशू कुलकर्णी व सारंग कुलकर्णी यांची हार्मोनियम जुगलबंदीने संगीत महोत्सव रंगतदार झाला.
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ, इचलकरंजी महापालिका यांच्या सहकार्याने दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इचलकरंजी येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृहात राज्याचे सांस्कृतिक प्रधान सचिव विकास खारगे, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत रात्री उद्घाटन झाले.
पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळाच्या सभागृह नुतनीकरणासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. याच कामासाठी ‘लोकसत्ताच्या सर्व कार्येषु सर्वदा या उपक्रमातून भरीव देणगी, निधी मिळाल्याबद्दल मंडळाचे सचिव उमेश कुलकर्णी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सहकार्य केल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरुपात ‘लोकसत्ता’चे कोल्हापूर जिल्हा विशेष प्रतिनिधी दयानंद लिपारे यांचा आमदार आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
इंद्रायणी मुखर्जी यांनी कृष्ण भजन सादर करून सुरुवात केली. ‘दर्या पार करू मोरी नाही ना’ ही यमन रागातील विलंबित बंदिशीचे स्वरूप रसिकांसमोर उभे केले. त्यानंतर द्रुतबंदीशी मधून अनेक प्रकारच्या तानांची आतषबाजी केली. सुधांशू कुलकर्णी – सारंग कुलकर्णी या बेळगावच्या पिता पुत्रांनी संवादिनी वादनाने रसिकांना खिळवून ठेवले. बिहार रागामध्ये शास्त्रशुद्ध मांडणी करत रागामधील अधिक सौंदर्यस्थळे खुलवली.
राहुल देशपांडे यांनी मारू विहार या रागातील सौंदर्यस्थळे अधिकाधिक लडिवाळपणे खुलवत रागाची सुंदर उभारणी केली. बोलआलाप,बोलताना, तिहाईया मुळे राग रंगतदार झाला. बिंदिया ले गई हा दादरा, रवी मी आहे हे नाट्यपद आणि कानडा राजा पंढरीचा या भक्ती गीताने विठ्ठल नामाचा गजर झाला.