You are currently viewing हस्तांतरण

हस्तांतरण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका जयश्री जिवाजी कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*हस्तांतरण*

 

पाहिले तुला न मी तरीही नित्य पाहते

तुझीच जाहल्या परी मी सदैव वागते

मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता

हृदयी प्रीत जागते जागता अजाणता

 

गाणं ऐकतो आपण नेहमी. श्रीकृष्णाला प्रत्यक्ष न पाहता त्याच्या रूपा गुणांचं वर्णन ऐकून रुक्मिणीचं मन जडलं त्याच्यावर !आणि तिने त्याला प्रेम पत्र लिहिलं. जगातलं हे प्रेम पहिलं प्रेम पत्र! तेच हे गाणं! खरंच हे प्रेम एक सुंदर जाणीव आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येतोच कधीतरी. कुठेतरी मन जुळतं आणि आपलं अस्तित्व विरघळून जातं त्या समोरच्यात सहजपणे!

हस्तांतरण ,हे मनाचं हस्तांतरण!

 

इशारो इशारो मे ,दिल निघून जातं हातातून !

तुम्हारा बने और हमे भूल जाये

 

अशी परिस्थिती होते .आणि मग सगळं विश्वच रंगीत होऊ लागतं .जळी ,स्थळी ,काष्ठी, पाषाणी, तो ,आणि तोच दिसतो! त्याच्याशिवाय अर्थच नाही आयुष्याला !त्याच्या त्या

 

अभी ना छोडकर के दिल अभी भरा नही

 

हे आर्जव आणि दोन डोळ्यांनी चाललेला तो खेळ हवाहवासा वाटतो. हे प्रेम ही एका वयाची मागणी असते. एकदा मन दिलं की आपलं आपल्याजवळ काहीच नाही! पण याचवेळी सावधानता बाळगण्याची गरज असते .हे एक फसवं मृगजळ ही असू शकतं. कदाचित एखादा शिकारी तिथे जाळं टाकून बसलेला असू शकतो .

 

पूर्वीच्या काळी दाखवून वगैरे लग्नं जमायची आणि चक्क कन्यादान व्हायचं !म्हणजे मुलीचं हस्तांतरण व्हायचं ,वडिलांच्या हातून पतीकडे सुपूर्त केलं जायचं त्या मुलीला !ना ओळख ना पाळख, अशा व्यक्तीला आयुष्य अर्पण करायचं पूर्ण !सोपी गोष्ट आहे का ही? नाहीच !पण आमच्या पिढीत समंजस पण होतं. एकदा त्याने पाणिग्रहण केलं की त्याच्या हाती भविष्य सोपवायचं !निमुटपणे! अशावेळी आहे ते स्वीकारण्याचे वृत्ती असल्याने संसार झाले आमचे .त्या न पाहिलेल्यावर पण मन जडलं मनही जडलं आमचं! प्रेमही केलं बरं का आम्ही !कधी काही गोष्टी घडल्याही मनाविरुद्ध ,पण त्या “आपल्या” माणसासाठी तेही सहन केलं ,आणि “साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली !

पण आज काही मुली सारासार विचार न करता बेधडक प्रेम करतात. आणि प्रेम काय आहे ते कळतच नसतं अशा वयामध्ये प्रेम ,प्रेम म्हणून देह पण अर्पून बसतात कोणाला. आणि मग फसगत झाली आहे हे समजतं तोवर फार उशीर झालेला असतो . या अशा अविचारी मुली पाहायला मिळतात आजकाल .आणि मग नको त्या बातम्या ऐकायला येतात .

दुसऱ्या प्रकारामध्ये खूप शिकलेल्या मुली ,आपलं अस्तित्व आपल्याजवळ राखून ,म्हणजे हातचे राखून प्रेम करतात. त्यांना कन्यादान मान्य नाही .नाव बदलणं मान्य नाही. मंगळसूत्र लोढणं वाटतं त्यांना! “गुलामगिरी “म्हणतात त्या संसाराला! आजची मुलं खरं तर खूप समजस झाली आहेत. हे सगळं त्यांनी स्वीकारलंय, तरी पण ,समर्पण भावनाच नसेल तर ,संसार होतील का ?आज मुलांच्या पेक्षा पालकांना याची जास्त चिंता आहे .विचार करण्याची वेळ आली आहे.

आणि मग” लिव्ह इन रिलेशनशिप” चं फॅड इकडे घेऊ पाहत आहे. “पटलं तर राहू एकत्र, नाहीतर देवू सोडून”! म्हणजे बांधून घ्यायलाच नको कोणाला कोणीच कोणामध्ये. आमच्या कुटुंब व्यवस्थेची विटंबना होईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे आम्हाला !व्यवहारीपणा हवाच , पण तो प्रेमात तरी नको .मी, माझं ,म्हणताना नको तेवढा इगो जोपासला ,तर तुटायला किती वेळ लागणार आहे?

परवा एक घटना घडली . की एक लग्न खूप धुमधडाक्यात झालं. आज काल पैशाला कमतरता नाही .सगळा झगमगाट,थाटामाट,दोन्ही कडून आपल्या वैभवाचं प्रदर्शन मांडलेलं! लग्न झालं .आई-वडीलही मुलींच्या लग्नाची जबाबदारी आता हल्ली घेत नाहीत. मुलगी” हो “म्हणाली की मात्र आनंदाने लग्न करून देतात .तर बरं का !चांगलं दोन अडीच वर्षे ही मुलं एकमेकांना ओळखत होती लव्ह मॅरेज ते.! आणि झालं लग्न! भरपूर फोटो वगैरे काढले .तीन चार महिन्याचा काळ गेला मधे. फोटोग्राफर ने उत्तम प्रकारचा अल्बम बनवला सांगितल्या प्रमाणे !आणि तो नेऊन द्यायला गेला तर ते म्हणायला लागले,” आता या अल्बमचा काय उपयोग डिव्होर्स घेताहेत म्हणे ते! बिच्चारा फोटोग्राफर !

अरे, पोर खेळ आहे का हा लग्न म्हणजे ?चांगले 30-32 वर्षाची झालेली ही मुलं, एवढंही पटवून घेता येऊ नये? प्रेमात पडला होतात ना? मग थोडा वेळ तरी द्यायचा, एकमेकांना समजावून घ्यायला! सहवासातून पटत गेलं असतं एकमेकांचं! प काय थोडेफार जवळ आलात, आणि त्यातही “इगो” सांभाळला असला, तर कसं कळणार मन तुम्हाला एकमेकांचं? अरे, दुर्गुणा सहित स्वीकारावं लागतं एकमेकांना! त्याला म्हणतात प्रेम! कारण कोणताच माणूस सद्गुणांचा पुतळा नसतो.

अरे ,बोलता बोलता तत्वज्ञानाकडे वळायला लागले मी! थांबायला हवं !पण एवढेच सांगावसं वाटतं .गुणांवर प्रेम कराल, दुर्गुण थोडे दृष्टी कराल , तर प्रीतीचं साम्राज्य निर्माण होईल .त्यासाठी मनाचं हस्तांतर करावं लागेल. त्याने तिच्याकडे मन सुपुर्त करावं आणि तिनै त्याच्याकडे ! हा” इगो “सोडून द्या! तो कधी कुणाचं भलं करील का? हे लक्षात घ्या. कारण प्रेम असेल तर याचा तरच या जगण्याला अर्थ आहे.

प्रेमाशिवाय ते जग म्हणजे वाळवंटच की !

जयश्री जिवाजी कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा