गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवा
– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना जिल्ह्यात प्राधान्यांने राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार बैठक घेण्यात आली, या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने, जिल्हा जलसंधारण अधिकारी सु.भा. गायकवाड, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी गो. ह. श्रीमंगले, पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही, एन. ठाकूर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, ऐश्वर्या काळुसे, आदी उपस्थित होते.
जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. गायकवाड यांनी माहिती दिली, वैभववाडी, तालुक्यातील कोकीसरे, नानीवडे, कणकवली तालुक्यातील सावडाव, जानवली आणि सावंतवाडी तालुक्यातील विलवडे, अशा 5 योजनेतील अंदाजी 67 हजार 512. 17 घन मिटर गाळ आहे. याआधी शासनाकडून फक्त इंधन खर्च देण्यात येत होता, परंतु यावेळी शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देणे प्रस्तावीत आहे.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, शेतकरी स्वत:हून गाळ नेण्यास तयार असेल तर त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे. त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा सहभागही वाढवावा. शासन निर्णयानुसार विधवा, अपंग आत्महत्याग्रस्त, अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये गाळ नेण्यासाठी अनुदान द्या. धरणातील गाळ निघाल्यांने पाणी क्षमतेसाठी तसेच शेतकऱ्यांचे शिवार फुलवण्यासाठीही फायदा होईल. निश्चतच उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.