शेतकरी व नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा कणकवली तहसीलदार आर जे पवार यांचे आवाहन..
कणकवली :
तालुकास्तरीय शासन आपल्या दारी हा कार्यक्रम दि. १ जून रोजी सकाळी १०.३० वा. येथील भगवती हॉलमध्ये आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कृषी महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार आर जे पवार व गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी दिली.
तालुकास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने यापुर्वी २८ एप्रिल रोजी प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व विभागांची बैठक झालेली होती. त्यानंतर मंगळवारी पंचायत समितीमध्ये नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व इतर उपस्थित होते.
या शासन आपल्या दारी कार्यक्रमात एकूण १८ स्टॉल्स असणार आहेत. यात विविध विभागांची माहिती सोबतच काही विभागांच्या लाभार्थ्यांना धनादेश अथवा थेट लाभाच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे यावेळी देण्यात येणार आहेत. याठिकाणी विशेष म्हणजे शासनाचे सर्वच विभाग एकाच छत्राखाली असणार आहेत. त्यामुळे नागरीकांना विविध योजनांची माहिती व लाभ एकाच ठिकाणी घेणे शक्य होणार आहे. यावेळी उभारण्यात येणाऱ्या स्टॉल्ममध्ये कृषी महसुल, पंचायत समिती, आरोग्य, पशुसंवर्धन, नगरपंचायत, बालविकास विभाग आदी विभागांचे हे स्टॉल्स असणार आहेत.
तसेच याचवेळी त्याठिकाणी कृषी महोत्सवही होणार असून येथे कृषी विभागाच्या योजनांच्या माहितीसोबत विविध अवजारे, बियाणे यांच्या विक्रीचे स्टॉल्सही असणार आहेत. या साऱ्याचा लाभ शेतकरी, नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन श्री. पवार व श्री. चव्हाण यांनी केले.
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणोती इंगवले, कृषी अधिकारी सुभाष पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एम. एन. चौगुले, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग व इतर उपस्थित होते.