You are currently viewing समाजाभिमुख कार्यामुळे विजयभाऊ अमर

समाजाभिमुख कार्यामुळे विजयभाऊ अमर

आठव्या स्मृतीदिनी भावपूर्ण श्रद्धांजली

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान देणारे स्व. विजयराव विष्णू नाईक यांचा आज आठवा स्मृतीदिन. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात काम केलेल्या विजयराव नाईक उर्फ ‘विजयभाऊ’ यांची कारकिर्द निश्चितच ‍आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक होती. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशा पदांवर काम केलेल्या ‘विजयभाऊ’ यांची प्रतिथयश बांधकाम व्यवसायिक म्हणूनही सिंधुदुर्गसह कोकणात ओळख होती. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करणार्‍या, सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाणार्‍या विजयभाऊंच्या स्मृती आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. विजयभाऊंनी आपल्या कामातून, आपल्या स्वभावातून अनेक माणसे जोडली. आपल्या कार्यातून विजयभाऊ हे अमर झाले आहेत.त्यांच्या राजकीय, सामाजिक कामांचा वारसा आणि विचारांचा वारसा आज खर्‍या अर्थाने त्यांचे दोन्ही सुपुत्र आमदार वैभव नाईक आणि उद्योजक सतीश नाईक समर्थपणे सांभाळत आहेत.

काही व्यक्तिमत्वे अशी असतात की त्यांचे कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व हीच त्यांची ओळख असते. युगानयुगे त्यांच्या स्मृती स्मरणात राहतात. अशाच व्यक्तिमत्वांपैकी विजयराव नाईक यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या अकाली निधनाला आज ३० मे रोजी आठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन येणार नाही. विजयराव नाईक यांना कणकवली तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांचे चाहते तसेच मित्रमंडळी आणि आप्तेष्ट ‘विजयभाऊ’ किंवा ‘भाऊ’ या नावाने संबोधत. त्यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात फार मोठ्या आदराची भावना होती. शून्यातून विश्‍व निर्माण करणारे विजयभाऊ व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनात नेहमी सचोटीनेच वागत. व्यावसायिक पातळीवर तर त्यांनी कायम सचोटीने व्यवहार केला. शिस्तीचे आणि शब्दाचे पक्के असलेले विजयभाऊ यांचे दातृत्वही मोठे होते. मात्र, त्यांनी त्याचा कधीच बोलबाला केला नाही. दान कधीही सत्पात्री व्हावे अशीच त्यांची भावना असायची. म्हणूनच कोणाला मदत केली अगर कुठच्या संस्थेला देणगी दिली तर ते कधीही त्याची प्रसिद्धी अगर कुठेही वाच्यता करत नसत. विविध क्षेत्रात त्यांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले होते.

विजयभाऊ नाईक यांचे कुटुंब मूळचे सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावचे. त्यांचे वडील दाजी नाईक हे व्यवसायानिमित्ताने १९६० च्या सुमारास कणकवलीत आले. नंतरच्या काळात नाईक परिवार कणकवलीतच स्थायिक झाला. कणकवलीतील बांधकाम व्यवसायाचा पायाच नाईक कुटुंबाने घातला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. विजयभाऊंनी प्रारंभीच्या काळात मोठ्या कष्टाने स्वत:च्या कर्तृत्वाच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर उद्योग व्यवसायात अग्रस्थान प्राप्त केले होते. शून्यातून विश्‍व निर्माण करणारे मॅनेजमेंट गुरू अशी उपाधी त्यांना कणकवली तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांना ओळखणार्‍या चाहत्यांनी दिली होती. याचे कारण भाऊंच्या कार्यशैलीमध्ये आणि कार्यपद्धतीमध्ये होते.

कणकवली कॉलेज आणि विद्यामंदिर हायस्कूल चालविणार्‍या कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक या नात्याने त्यांचे कणकवलीच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानही मोठे होते. कणकवली कॉलेज आणि विद्यामंदिर हायस्कूलच्या उभारणीत सर्वार्थाने त्यांचा कायम सिंहाचा वाटा राहिला. प्रारंभीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा मराठा मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. कणकवली कॉलेज आणि विद्यामंदिर हायस्कूलच्या शैक्षणिक कामात आणि विकासात ते नेहमी आघाडीवर असायचे.

राजकारणातही विजयभाऊंनी अनेक पदांवर काम केले. कार्यकर्त्यांना जपणारा, त्यांना सन्मान देणारा नेता अशी त्यांची ओळख होती. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीसपदही त्यांनी भुषविले. मात्र राजकारणात काम करताना कायम सचोटीनेच ते वागले. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. कणकवलीच्या आणि जिल्ह्याच्या जडणघडणीतही त्यांचा मोठा वाटा आहे.

त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सतीश आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या यशस्वी व्यावसायिक व राजकीय जीवनात विजयभाऊंचे मार्गदर्शन व प्रेरणा मोलाची आहे. विजयभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा आज त्यांचे दोन्ही चिरंजीव समर्थपणे सांभाळत आहेत. आ. वैभव नाईक यांनी राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. कुडाळ – मालवण मतदारसंघासह सिंधुदुर्गातील एक लोकप्रिय आमदार म्हणून वैभव नाईक यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. यामागे खर्‍या अर्थाने त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद आणि विचारांची प्रेरणाच आहे. ज्याप्रमाणे विजयभाऊंनी माणसे जोडली तशीच माणसे जोडण्याचे काम त्यांचे दोन्ही सुपुत्र करत आहेत. आपल्या कार्यातून विजयभाऊंच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

विजयभाऊ स्वर्गवासी झाल्यानंतर आठ वर्षे लोटली परंतु त्यांना मानणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांना जवळून अनुभवणारे, अनेकजण आजही विजयभाऊंच्या स्मृती आणि कार्यकर्तृत्वाबद्दल भरभरून बोलतात. विजयभाऊंसारखी कर्तृत्ववान, अडीअडचणीला धावून जाणारी, प्रसंगी पदरमोड करून दुसर्‍यांना मदत करणारी व्यक्तीमत्वे आज समाजात दुर्मिळ होत चालली आहेत. त्यांचा आदर्श सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतीदिनी भावपूर्ण श्रद्धांजली!

प्रतिक्रिया व्यक्त करा