अमॅच्युअर’च्या मार्शल आर्ट समर कॅम्पमध्ये पॉंडिचेरीची हर्षिता चौधरी प्रथम
इचलकरंजी –
येथील अमॅच्युअर तायक्वोंदो अकॅडमीने आयोजित केलेल्या समर कॅम्पचा समारोप पार पडला. या समर कॅम्पमध्ये हर्षिता नवनीथ चौधरी (पॉंडिचेरी) हिने प्रथम क्रमांक पटकावला.
एक महिना चाललेल्या मार्शल आर्ट कॅम्पमध्ये शिबीरार्थींना आत्मसंरक्षणाचे विविध प्रकार शिकविण्यात आले. बचावाची तंत्रे, आक्रमणाचे डावपेच याबरोबरच मार्शल आर्टसाठी शारीरिक कसरतींचा सराव, शो-फाईट, किक्स, पंचेस आदि प्रकार करुन घेण्यात आले. आदिश राहूल जैन (हैदराबाद) याने द्वितीय क्रमांक तर दृष्टी नवनीथ चौधरी (पॉंडिचेरी) हिने तृतीय क्रमांक मिळविला.
शिबीर समारोप प्रसंगी शिबीरार्थींनी आत्मसात केलेल्या मार्शल आर्ट कलेची प्रात्यक्षिके सादर केली. तारदाळचे वतनदार गुरुकुमार पाटील यांच्या हस्ते शिबीरार्थींना प्रशस्तीपत्रे वितरित करण्यात आली. यावेळी सौ. मीरा चौधरी, सौ. खुशबू जैन उपस्थित होत्या. स्वागत ग्रॅण्डमास्टर रविकिरण चौगुले यांनी केले.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक रोहित सुतार, रिया चौगुले (ब्लॅक बेल्ट), श्रेया चौगुले (ब्लॅक बेल्ट) आदिंनी विशेष परिश्रम घेतले.