“विज्ञानालाच धर्म मानणारा हिंदू हा एकमेव धर्म!” – डॉ. रमेश पांडव
पिंपरी
“विज्ञानालाच धर्म मानणारा हिंदू हा जगातील एकमेव धर्म होय!” असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समरसता गतिविधी मंडळाचे सदस्य डॉ. रमेश पांडव यांनी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २८ मे २०२३ रोजी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४०व्या जयंतीनिमित्त आणि निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ४०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून डॉ. रमेश पांडव यांच्या हस्ते राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २०२३ चे वितरण करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव सागर पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मणिपूर राज्यातील पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान या संस्थेला एक लक्ष रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह तसेच महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील पूर्वांचल विकास प्रकल्प छात्रावास या संस्थेला रुपये एकावन्न हजारांचा धनादेश, स्मृतिचिन्ह प्रदान करून अनुक्रमे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
मणिपूरच्या पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे प्रमुख जयंत कोंडविलकर यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना, “पूर्वांचलमध्ये आम्ही भारतीय आहोत ही भावना तेथील नागरिकांमध्ये रुजवताना माझ्या खारीच्या वाट्यामध्ये भय्याजी काणे यांची प्रेरणा आहे!” अशी कृतज्ञता व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर येथील पूर्वांचल विकास प्रकल्प छात्रावासचे प्रकल्पप्रमुख केदार जोशी यांनी आपल्या मनोगतातून छात्रावासात शिक्षण घेतलेल्या पूर्वांचलच्या तरुण-तरुणींनी पुन्हा पूर्वांचलमध्ये जाऊन केलेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विविध कार्याची माहिती दिली.
याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील छात्रावासासाठी आपले स्वतःचे घर दान करणाऱ्या ओक दांपत्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. रमेश पांडव पुढे म्हणाले की, “कर्मठ हिंदू समाजात असलेल्या स्पर्शबंदी, सिंधुबंदी, व्यवसायबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, धर्मबंदी आणि शुद्धीबंदी या सप्तबंदी झुगारून देण्याचा संकल्प सावरकरांनी केला. त्याचे फलित म्हणजे आज सामाजिक जीवनात या बंदींचे पालन कोणीही करीत नसले तरी अजूनही मनातून त्या पूर्णपणे गेलेल्या नाहीत. आज संपूर्ण जग विज्ञाननिष्ठा असलेल्या हिंदूंच्या भारताकडे खूप मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे जितके विज्ञान पुढे जाईल तितकाच हिंदूधर्म प्रस्फुटित होईल. त्यासाठी हिंदुत्व म्हणजे मी, समाज, चराचर सृष्टी यांचे शोषण न करता दोहन करण्याची वृत्ती अंगीकारली तर जगाचा पोशिंदा म्हणून भारत देश संपन्न, समृद्ध म्हणून नावलौकिकास पात्र होईल!”
पूर्वांचलच्या विद्यार्थिनीने सादर केलेल्या “जयोस्तुते…” या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. संजय भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव राजेंद्र देशपांडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. पुरस्कार सोहळाप्रमुख प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून पुरस्कारार्थी संस्थांची माहिती प्रदर्शित करण्यात आली. सागर पाटील यांनी आभार मानले. सिद्धी कापशीकर या विद्यार्थिनीने सादर केलेल्या संपूर्ण वंदेमातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२