*अधिनाम प्रमुखांनी ‘सेंगोल’ पंतप्रधान मोदींना सुपूर्द केला, उद्या नवीन संसद भवनात पवित्र राजदंड बसवला जाईल*
नवी दिल्ली (गुरुदत्त वाकदेकर) :
संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी अधिनम महंतांनी ‘सेंगोल’ हा पवित्र राजदंड सुपूर्द केला. महंतांनी त्यांना एक खास भेटही दिली.
आज अधिनम पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. पंतप्रधानांनीही त्यांचे आशीर्वाद घेतले. काल धर्मपुरम आणि तिरुवदुथुराई येथील अधिनम राजधानीत पोहोचले. रविवारी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात ऐतिहासिक आणि पवित्र ‘सेंगोल’ बसवणार आहेत. २१ अधिनम उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी चेन्नईहून दिल्लीला रवाना झाले होते. धर्मपुरम अधिनम, पलानी अधिनम, विरुधाचलम अधिनम आणि थिरुकोयिलूर अधिनम हे अधिनमांपैकी होते जे चेन्नईहून दिल्लीला उत्सवात सहभागी होण्यासाठी पोहचले आहेत. नवीन संसद भवनात सेंगोलची स्थापना करण्यापूर्वी अधिनस्थ महंतांचे आशीर्वाद घेत पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, आज तुम्ही सर्वजण माझ्या निवासस्थानी आहात, ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. उद्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी तुम्ही सर्वजण तिथे येऊन आशीर्वाद देणार आहात याचा मला खूप आनंद आहे.
ते पुढे म्हणाले, तामिळनाडूने आपल्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या स्वातंत्र्यात तमिळ लोकांच्या योगदानाला जे महत्त्व द्यायला हवे होते ते दिले गेले नाही. आता भाजपने हा मुद्दा ठळकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. तामिळ परंपरेत सेंगोल हे राज्य करणाऱ्या व्यक्तीला दिले जाते, हे प्रतीक आहे की, ते धारण करणारी व्यक्ती देशाच्या कल्याणासाठी जबाबदार आहे आणि कर्तव्याच्या मार्गापासून कधीही विचलित होणार नाही.
*नवीन संसद भवन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज, खासदारांना होणार नाही कसलीच अडचण, ही आहेत पाच महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य*
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (२८ मे) नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. नवीन वास्तूत देशातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. नवीन संसद भवनात राज्यसभा आणि लोकसभेसोबतच एक संविधान सभागृहही बांधण्यात आले आहे. त्यात देशाच्या संविधानिक वारशाचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वास्तूतील लोकसभेत ८८८ खासदारांची बसण्याची क्षमता असेल. तर राज्यसभेचा आकार लोकसभेपेक्षा लहान असेल. राज्यसभेत ३८४ खासदार बसू शकतील. दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. यामध्ये १२८० खासदार एकत्र बसू शकतील. नवीन इमारतीत खासदारांच्या सुविधांची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
नवीन संसद भवनाच्या बांधकामादरम्यान वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. यात सर्व संसद सदस्यांसाठी एक विशेष विश्रामगृह, एक ग्रंथालय, जेवणाचे हॉल आणि वाहनतळाची जागा आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नवीन संसद भवनात महत्त्वाच्या कामांसाठी स्वतंत्र कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.
कॅफे, डायनिंग एरिया, कमिटी मीटिंग रूममध्येही अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. कॉमन रूम व्यतिरिक्त महिलांसाठी लाउंज, व्हीआयपी लाउंजचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष विश्रामगृहांमध्ये खासदारांना त्यांचे सहकारी, कुटुंबातील सदस्य आणि संसदेत भेटायला येणाऱ्या लोकांना बोलावण्याचे स्वातंत्र्य असेल.
जुन्या इमारतीच्या तुलनेत नव्या इमारतीतील लोकसभा आणि राज्यसभेत खासदारांच्या बसण्याची व्यवस्था सुधारण्यात आली आहे. जुन्या सभागृहांमध्ये खासदारांना बसण्यास सर्वाधिक त्रास होत असे. पण नवीन संसद भवनाच्या दोन्ही सभागृहात जागा वाढवण्यात आली आहे. आता लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात प्रत्येक बेंचवर फक्त दोन सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. जुन्या इमारतीत खासदारांना ये-जा करताना त्रास व्हायचा. मात्र नव्या सभागृहात खासदारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय ये-जा करता येणार आहे. या दरम्यान कोणालाही कोणतीही अडचण येणार नाही.
नवीन संसद भवन अत्याधुनिक बनवण्याबरोबरच नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आले आहे. खासदारांच्या सुविधा लक्षात घेऊन प्रत्येक आसनावर डिजिटल यंत्रणा आणि टच स्क्रीन बसवण्यात आली आहे. खासदारांना त्यांच्या मोबाईल किंवा टॅबलेटवरून ही डिजिटल प्रणाली थेट जोडता येणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे ही यंत्रणा त्याच सीटशी जोडली जाणार आहे, जी त्यांना लोकसभा सचिवालयाने अधिकृतपणे दिली आहे. या डिजिटल प्रणालींवर संसदेच्या कामकाजाच्या तपशिलासोबतच खासदारांना त्यांच्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही पाहता येणार आहेत. संसदेला कागद विरहित कामकाज करण्याचे कामही केले जात आहे. त्यामुळे खासदारांना आता या यंत्रणांद्वारेच महत्त्वाची माहिती मिळू शकणार आहे.
नवीन संसद भवन संकुलात अद्ययावत दृकश्राव्य यंत्रणाही बसवण्यात आली आहे. संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी आणि अधिवेशन तहकूब झाल्यानंतर खासदार आणि कर्मचाऱ्यांनाही त्यांच्यामार्फत माहिती दिली जाईल. जुन्या इमारतीप्रमाणेच नवीन इमारतीत खासदारांसाठी आरामदायी डायनिंग हॉल तयार करण्यात आला आहे. याशिवाय वयोवृद्ध खासदारांसाठी अनेक प्रकारच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी राजस्थानमधील सर्मथुरा येथून वाळूचा खडक, महाराष्ट्रातील नागपूर येथून सागवान लाकूड आयात करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून कार्पेट्स आणण्यात आले आहेत. बांबूचे लाकूड फ्लोअरिंग त्रिपुराची राजधानी आगरतळा येथून आले आहे. दगडी जाळीची कामे राजस्थानमधील राजनगर आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथून करण्यात आली आहेत. अशोक चिन्ह महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानमधील जयपूर येथून प्राप्त झाले आहे. अशोक चक्र मध्य प्रदेशातील इंदूर येथून घेण्यात आले आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथून लाल लाख आणण्यात आली आहे. त्याच राज्यातील अंबाजी येथून पांढरे संगमरवरी दगड खरेदी करण्यात आले आहेत. भगवा हिरवा दगड उदयपूरमधून आणला गेला आहे. चक्री दादरी, हरियाणा येथून एम-वाळू, एनसीआर हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथून फ्लाय अॅश विटा खरेदी करण्यात आल्या. गुजरातमधील अहमदाबाद येथून ब्रास वर्क आणि प्री-कास्ट खंदक मिळवले आहेत. दमण आणि दीव येथून एलएस/आरएस फॉल्स सीलिंग स्टील स्ट्रक्चर मागवण्यात आले आहे.