You are currently viewing स्वनिधितून १५ जून पूर्वी शिक्षक उपलब्ध करा

स्वनिधितून १५ जून पूर्वी शिक्षक उपलब्ध करा

अन्यथा जिल्हाभर आंदोलने:आ वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा

सिंधुदुर्गनगरी

शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात रिक्त पदांमुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत लागली आहे. १२१ शाळा शिक्षक नसल्याने बंद होणार आहेत. तर अन्य ५०० हून अधिक मोठ्या पटसंख्येच्या शाळेमध्ये एक-दोन शिक्षकच कार्यरत राहिले आहेत. याचा त्या शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होणार आहे. तरी जिल्हा परिषद स्व निधीतून तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्त्या द्या. अन्यथा १५ जून रोजी सर्व पालकांसह विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिला आहे.

उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे आमदार वैभव नाईक व जिल्हा प्रमुख सतीश सावंत यांनी आज जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची भेट घेत जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदाबाबत चर्चा केली. तसेच प्रशासनास निवेदन देऊन जिल्ह्यातील एकही शिक्षक नसलेल्या १२१ शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद स्वनिधीतून शिक्षकांच्या नियुक्त्या करा अशी मागणी केली आहे. यावेळी चर्चा करताना सतीश सावंत यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत शिक्षक नसल्याने जिल्ह्यातील एकही शाळा बंद होणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीमुळे मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. अद्याप शिक्षक भरती बाबत कोणताही निर्णय शासनाकडून घेतला गेलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा वाचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ज्या शाळेत एकही शिक्षक नाही तेथे नव्याने प्रवेश घेणाऱ्या मुलांना दाखल करून कोण घेणार? पोषण आहाराची व्यवस्था कोण सांभाळणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले तर याबाबत प्रशासनाच्या वतीने काय नियोजन केले आहे याबाबत विचारणा केली. तसेच येथील मुलांचे नुकसान होऊ नये, शाळा बंद पडू नयेत, यासाठी जिल्हा परिषद स्वनिधीतून हंगामी शिक्षकांची भरती करा अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

यावेळी माहिती देताना शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८०२ उपशिक्षक व ३१६ पदवीधर शिक्षक अशी एकूण १११८ पदे रिक्त झाली आहेत. शासन आदेशानुसार जिल्ह्यात १० टक्केहुन अधिक पदे रिक्त असतानाही ४५१ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने मुक्त करावे लागले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १२१ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही तर अन्य मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्येही एक-दोन शिक्षकच कार्यरत राहिले आहेत. त्यामुळे शाळा आणि शाळांचा पट कायम राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. तसेच शिक्षक भरतीसाठी शासनाकडे टेट परीक्षा दिलेल्या उमेदवारांची यादी तयार आहे. मात्र भरती बाबत अद्याप कोणतेही निर्देश नाहीत त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. अशी माहिती यावेळी दिली.

रिक्त पदामुळे परिस्थिती बिकट आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ४५१ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त केले आहे. तर केवळ ११ शिक्षक जिल्ह्यात आले आहेत. अद्यापही १११८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षक नाहीत अशा शाळांवर कामगिरीवर शिक्षक पाठवताना अनेक अडचणी येणार आहेत. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे जिल्ह्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे– श्री महेश धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग,

शासनाचे, शाळा बंद करण्याचे षडयंत्र
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधीच मोठ्या प्रमाणात शिक्षकांची रिक्त पदे असताना ती न भरता आंतर जिल्हा बदली शिक्षकांना मुक्त करण्यात आले आहे ही शासनाची नवी चाल असू कमी पटसंख्येच्या शाळा बद्दल करण्याचे षडयंत्र आहे कोकणासाठी शासनाने वेगळे धोरण राबवणे आवश्यक असताना डीएड उमेदवारांना टेट परीक्षेच्या चक्रव्यूहात अडकविण्यात आले आहे आता नव्याने होणाऱ्या भरतीमध्येही पर जिल्ह्यातील उमेदवार जिल्ह्यात दाखल होणार आहेत.याचा शैक्षणिक दर्जावर परिणाम होणार आहे १० वी, १२ वी च्या परीक्षांच्या निकालात आघाडीवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला रोखण्याचे धोरण शासन अवलंबित आहे .हे चुकीचे धोरण हाणुन पाडण्यासाठी प्रसंगी तीव्र आंदोलन केले जाईल—श्री सतीश सावंत, जिल्हा प्रमुख, ( उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना)

शिक्षण मंत्र्यांनी आपल्या तत्वज्ञानाचा वापर शाळा वाचवण्यासाठी करावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला तीन मंत्री मिळाले आहेत. तरीही जिल्ह्याला अनेक समस्या भेडसावत आहेत. सर्वांना तत्त्वज्ञान सांगणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी आता शाळा वाचवण्यासाठी आपल्या तत्त्वज्ञानाचा वापर करावा.चुकीच्या निर्णयाने येथील गरीब विद्यार्थी आणि स्थानिक डीएड उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आणु नये.न पेक्षा याची किम्मत मोजावी लागेल.—आमदार श्री वैभव नाईक.

प्रतिक्रिया व्यक्त करा