इचलकरंजीत बेंदूर सणानिमित्त बैलांच्या लाकूड ओढणे शर्यतीचे आयोजन
इचलकरंजी/प्रतिनिधी –
येथील इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने कर्नाटक बेंदूर सणाच्या निमित्ताने वस्त्रनगरीतील शतकोत्तर परंपरा असलेल्या भव्य बैलांच्या
लाकूड ओढण्याच्या शर्यतींचे आयोजन करण्यात आले. 30 व 31 मे आणि 1 जून रोजी डीकेटीई नारायण मळा येथे या शर्यती होणार आहेत. तर 3 जून रोजी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात भव्य जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, अशी माहिती इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते व उपाध्यक्ष नंदू उर्फ बाबासो पाटील यांनी दिली.
इचलकरंजी शहराचे अधिपती श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी सुरु केलेल्या पारंपारिक लाकूड ओढण्याच्या शर्यती इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव मंडळाच्या वतीने अखंडीतपणे सुरु ठेवून शतकोत्तर परंपरा जोपासली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही कर्नाटक बेंदूर सणाचे औचित्य साधत 30 व 31 मे आणि 1 जून रोजी भव्य लाकूड ओढण्याच्या शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान प्रगतशील शेतकरी उत्तम आवाडे हे भूषविणार आहेत.
30 मे रोजी लहान गटातील लाकूड ओढण्याच्या शर्यती होणार आहेत. त्यामध्ये प्रथम क्रमांकास 75000/- शिल्ड व चांदीची फिरती गदा, द्वितीय क्रमांकास 51000/- व शिल्ड आणि तृतीय क्रमांकास 31000/- व शिल्ड अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. 31 मे रोजी मोठ्या गटातील लाकूड ओढण्याच्या शर्यती होणार आहेत. त्यामध्ये प्रथम क्रमांकास 1,00,000/- शिल्ड व चांदीची फिरती गदा, द्वितीय क्रमांकास 75000/- व शिल्ड आणि तृतीय क्रमांकास 51000/- व शिल्ड अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर 1 जून रोजी सुट्टा बिनदाती बैल पळविणे स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 11000/- व शिल्ड, द्वितीय क्रमांकास 7000/- व शिल्ड आणि तृतीय क्रमांकास 5000/- व शिल्ड बक्षिस देण्यात येईल.
त्याचबरोबर 3 जून रोजी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात जनावरांचे भव्य असे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. या प्रदर्शनात विविध जातीवंत खिल्लार जनावरे पाहण्यास मिळणार आहेत. तर लाकूड ओढण्याच्या शर्यती व जनावर प्रदर्शनाचा बक्षिस वितरण समारंभ तसेच बेंदूर सणानिमित्त कर तोडण्याचा कार्यक्रम 5 जून रोजी गावभागातील जुनी गावचावडी महादेव मंदिर चौक येथे शिवाशिष पाटील व देवाशिष पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर बक्षिस वितरण समारंभ सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या सर्वच शर्यती, जनावरांचे प्रदर्शन आणि कर तोडण्याच्या पारंपारिक कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बाळासाहेब कलागते व नंदू पाटील यांनी केले आहे.