You are currently viewing बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कामकाज पाहून भारावले जी-२० शिष्टमंडळ

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कामकाज पाहून भारावले जी-२० शिष्टमंडळ

*बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कामकाज पाहून भारावले जी-२० शिष्टमंडळ*

*आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यगटाच्या शिष्टमंडळाची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

जी-२० परिषदेच्या आपत्ती जोखमी सौम्यीकरण कार्यगटाची बैठक मुंबईत दिनांक २३ ते २५ मे २०२३ या कालावधीत होत आहे. या बैठकीसाठी आलेल्या शिष्टमंडळाने आज (दिनांक २३ मे २०२३) बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. महानगरपालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालय इमारतीचे पुरातन वारसा दर्शन अर्थात हेरिटेज वॉक करण्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचाही अभ्यास दौरा या शिष्टमंडळाने केला. मुख्यालयाची भव्यदिव्य व नेत्रदीपक वास्तूरचना पाहून शिष्टमंडळातील सदस्य भारावून गेले. तर, विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मिती संकटांच्या वेळी करावयाचे प्रतिबंध, उपशमन आदींबाबतची महानगरपालिकेची सज्जता पाहून शिष्टमंडळाने कौतुक केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) (अतिरिक्त कार्यभार) रमेश पवार, सहआयुक्त (दक्षता) अजित कुंभार, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे यांच्यासह विविध मान्यवरांनी शिष्टमंडळातील सदस्यांचे मुख्यालयात स्वागत केले.

जी-२० देशांच्या गटांच्या अध्यक्षपदाचा बहुमान यंदा भारताला मिळाला आहे. त्याचा एक भाग म्हणून देशातील विविध शहरांमध्ये निरनिराळ्या विषयांवर जी-२० देशांच्या कार्यगटांच्या बैठका होत आहेत. त्यातील ‘आपत्ती जोखीम सौम्यीकरण’ कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत आजपासून सुरू झाली आहे. सुमारे १२० पेक्षा अधिक प्रतिनिधी त्यात सहभागी आहेत.

या प्रतिनिधींनी आज सायंकाळी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने त्यांचे लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या स्वागताने सर्व सदस्य भारावून गेले.

मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला जी-२० सदस्यांनी भेट दिली. त्यावेळी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्वतः आपत्कालीन व्यवस्थापन विभागासह नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. निरनिराळ्या आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून प्रतिबंध, उपशमन आणि सज्जतेसाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपाययोजना, मुंबईवर आजवर आलेल्या विविध नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवेळी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केलेली कामगिरी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची सुसज्जता, जनसहभाग वाढविण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न आदींसंदर्भात विस्तृत माहिती शिष्टमंडळासमोर लघूचित्रफित तसेच कॉफी टेबल बुक यांच्या रुपाने देखील सादर करण्यात आली. संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) श्रीमती रश्मी लोखंडे यांनी संयोजन केले.

त्यानंतर शिष्टमंडळाने गटागटाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूचा ‘हेरिटेज वॉक’ केला. मुख्यालय इमारतीची ऐतिहासिक माहिती, बांधकाम, वास्तूरचना, इतिहास आदींबाबत इत्थंभूत माहिती या सदस्यांना देण्यात आली. भव्यदिव्य अशा या वास्तूरचनेचे मूळ रुप जपण्यासाठी महानगरपालिकेने आजवर केलेल्या प्रयत्नांचे देखील पाहुण्यांनी कौतुक केले. सुमारे तीन तासांच्या या भेटीदरम्यान शिष्टमंडळासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वागत समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता. एकंदरीतच, महानगरपालिकेने केलेल्या आदरातिथ्याने शिष्टमंडळ भारावून गेले.

*मुंबईतील लोकप्रिय व्यंजनांचा पाहुण्यांनी घेतला आस्वाद*

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या मध्यभागी असलेल्या प्रांगणात जी-२० शिष्टमंडळातील छोटेखानी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील लोकप्रिय रुचकर व्यंजनांचा पाहुण्यांनी आस्वाद घेतला. पाणीपुरी, भेळ, मुंबई चाट, समोसा, वडापाव, पावभाजी, मुंबईचा मसाला चहा इत्यादी व्यंजनांचा यामध्ये समावेश होता. या व्यंजनांचा आस्वाद घेतल्यानंतर प्रतिनिधींनी भारतीय आणि खास मुंबईकर खानपान, खाद्यसंस्कृतीचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांच्याबाबतची माहिती देखील जाणून घेतली.

*पाहुण्यांनी केली बासरीवादकांना राग ‘हंसध्वनी’ वाजवण्याची फर्माईश*

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कोर्टयार्ड परिसरात पाहुण्यांसाठी खास बासरीवादन ठेवण्यात आले होते. पंडित भुपेंद्र बेलबन्सी यावेळी बासरीवर यमन राग वाजवत असताना पाहुणे त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी या रागाचा आनंद घेतला. त्यानंतर लागलीच पाहुण्यांनी पंडित भुपेंद्र बेलबन्सी यांना राग ‘हंसध्वनी’ वाजवण्याची फर्माईश केली. पंडित बेलबन्सी यांनीही त्यांची फर्माईश पूर्ण केली. पाहुण्यांनी अशा प्रकारे भारतीय शास्त्रीय संगीतातील एका रागाची फर्माईश करून एक सुखद धक्का दिल्याची भावना पंडितजींनी यावेळी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा