*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती धोंडी मसूरकर लिखित अप्रतिम लेख*
*माझे आजोळ माझी जन्मभूमी*
*गाव – कोरगाव*
*तालुका – पेडणे*
*राज्य – गोवा*
*वाऱ्यावर होडी वल्हवुया*
*खाडीची शोभा पाहुया*
*खाडीतील मासे पकडुया*
*मामाच्या गावाला जाऊया*
गाडीत बसून पळणारी झाडे पाहत मामाच्या गावाला जाण्याचा सुखद क्षण प्रत्येकानेच अनुभवलेला असतो.
मला माझ्या मामाच्या गावी जायचं या कल्पनेनेच अंगात आजही स्फुरण चढतं . माझ्या मामाच्या गावी झुक झुक गाडी जात नाही तर चक्क पाण्यातून जावं लागतं . पाण्यातून चालणाऱ्या होडीतून डुलत गिरकी घेत, खाडीची शोभा पाहत , ऐलतिरावरून पैलतिरी जाणे म्हणजे एक अविस्मरणीय आनंदाचा क्षण ……!
माझे आजोळ गोवा राज्यातील कोरगाव . हे खाडीच्या तीरावर वसलेले एक छोटेसे खेडेगाव . खेडेगाव जरी असले तरी निसर्गाने मात्र या गावावर मुक्त हस्ते उधळण केली आहे . संपूर्ण गोवा राज्यावरच निसर्गाची कृपा आहे . त्यामुळेच पर्यटनाच्या दृष्टीने गोवा हे समृद्ध सधन राज्य आहे.
मे महिन्याच्या सुट्टीत आठ दिवस राहण्यासाठी आम्ही आई सोबत मामाकडे जायचो. रेडीतून एसटीने आरोंदा किरण पाण्यावर उतरायचो . तेथून होडी असायची . या होडीत बसून पलीकडे जाणे म्हणजे अत्यानंदाचा क्षण . अंगाला झोंबणारा गार वारा, अंगावर उडणारे पाण्याचे तुषार, पाण्यात फिरत असणारे मासे प्रत्यक्ष पहायला मिळायचे . माश्यांचे भिरे पाहिले की, पाण्यात हात घालून एखादा मासा पकडायचा असा मोह व्हायचा . पण मनात भीती असायची . शिवाय होडीवाल्याने व आई-बाबांनी दिलेली कडक सूचनाही असायची . त्यामुळे ते सुंदर दृश्य डोळ्यांनी पाहत मनात साठवायचे . आजही ते चित्र जशास तसे डोळ्यासमोर येते अन् पुन्हा एकदा मामाच्या गावी मन धाव घेते .
पैलतिरी गेल्यावर तिथे पायलट उभे असायचे . तुम्ही म्हणाल *पायलट*? म्हणजे चक्क विमान यायचं की काय न्यायला? हो विमानच ते कारण पूर्वी चुकून एखाद्याच्याच घरी असायची ती मोटरसायकल हो ! गोव्यात मोटरसायकल चालवणाऱ्याला *पायलट* म्हटलं जायचं. तो रुबाबात मोटरसायकलवर स्वार व्हायचा . विचारायचा *पालया या? कोरगाव या ?* दोन चाकी विमानात आम्ही बसायचो .पायलट ऐटीत स्वार व्हायचा व भरदाव वेगाने आम्हाला आमच्या मामाच्या घरी पोचवायचा . लाल मातीचा रस्ता व रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे आंबा, काजू ,फणस आदी दाटीवाटीने असणारे वृक्ष वाकून जणू स्वागतासाठी उभे असायचे. भालखाजण ही मामाची वाडी . पहिल्यांदा आमच्या मावशीचं घर लागायचं त्यामुळे तिथे आम्ही उतरायचो . मावशी, काका , त्यांची मुले आनंदाने हसत आमचे स्वागत करायची . विचारपूस करायची . मावशीचा मुलगा भाई, एक विनोदी माणूस . त्याच्या बोलण्यात इतके विनोद असायचे की आम्ही पोट धरून हसायचो. आज तो या जगात नाही पण त्याच्या मिश्किल आपुलकीच्या स्वभावामुळे तो कायम स्मरणात राहतो.
मामाच्या घरी कोकणी भाषा बोलली जायची. पण आम्ही महाराष्ट्रातील म्हणून ते सगळेजण आमच्या सोबत मराठी बोलायचे. त्यांचं ते गमतीदार आपुलकीचं बोलणं मनाला आनंद द्यायचं . काही क्षणातच सर्वांशी दोस्ती व्हायची.
मामाच्या घरचे आडीत पिकलेले आंबे व झाडावर पिकलेल्या फणसाचे गरे खाण्यात एक अविट गोडी होती . आंब्याच्या ,काजूच्या राईत म्हणजेच भाटल्यात मामा-मामी सोबत फिरताना खूप मजा यायची . खाडीच्या किनाऱ्यालगत मामाची शेती होती . या शेतीत मिरच्या लावलेल्या असायच्या . त्या मिरच्यांना मोटेने पाणी द्यायचं , मिरच्या काढणे ही कामे करताना गंमत वाटायची . खरी मजा तर मामा सोबत खाडीत जाऊन खुबे , तिसरे , कोलंबी , कालवे काढून आणण्यात वाटायची . मामा पाण्यात उतरायचा पोहायचा . आम्ही किनाऱ्यावर दूरवर उभे राहून सगळी गंमत भान हरपून पहायचो . मामाची मुले सगळी माहिती द्यायची . मामीच्या हातचे सुखे तिसरे , कालवे , कोलंबीचे सार व गरमागरम भात किंवा तांदळाची भाकरी खाणे म्हणजे एक वेगळंच सुख . आजही ती चव जिभेवर रेंगाळते . नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटतं .
मामाचे अंगण मोगरा , जाई – जुई च्या फुलांच्या सुवासाने दरवळलेले असायचे . भर दुपारी सुद्धा अंगणात इतका थंडगार वारा सुटलेला असायचा की पंख्याची गरज कधीच भासायची नाही .आठ दिवस कधी निघून जायचे कळायचेही नाही . *घरा वैता गो ? चार दिस राव मगो* असा आणखी थोडे दिवस राहण्यासाठी आपुलकीचा आग्रह असायचा .
कोरगाव हे गाव गोवा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आहे . गोवा व सिंधुदुर्गच्या मध्ये तेरेखोलची खाडी आहे . या खाडीतून पूर्वी होडीने नंतर फेरीबोटीने प्रवास चालायचा . आता मात्र आरोंदा किरण पाणी ते हरमल यांना जोडणारे सुसज्ज असे पूल बांधले आहे .त्यामुळे गोव्याला जाणे खूप सोयीचे झाले आहे . अतिशय रमणीय असा हा परिसर आहे . कोरगावच्या शेजारी हरमल सागरकिनारा व केरी सागरकिनारा पलिकडे तेरेखोल किल्ला आहे . त्यामुळे देश विदेशातून अनेक पर्यटक या ठिकाणी फिरायला येतात .हॉटेल , रेस्टॉरंट इत्यादी व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर चालतात .
श्री कमळेश्वर व भूमिका देवी हे या गावचे ग्रामदैवत . कमळेश्वर म्हणजेच शंकर .अतिशय सुंदर व जागृत असे देवस्थान . *या मंदिराचा जिर्णोद्धार फार पूर्वी रेडी गावच्या म्हणजेच पूर्वीच्या रेवतीनगरची राणी कमलादेवीने केला होता* *राणी कमलादेवीच्या नावावरूनच देवाचं नाव कमलेश्वर असे ठेवण्यात आले .* अशी आख्यायिका आहे . भूमिका देवी म्हणजे साक्षात पार्वती . तिचे वारूळ स्वरूप तिथे आहे . या वारुळात नागिणीच्या रूपात पार्वती देवी निवास करते अशी गावातील लोकांची श्रद्धा आहे . वार्षिक जत्रोत्सव मोठ्या थाटामाटात हे लोक साजरा करतात . नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून गावातील लोक या देवांना भजतात . माहेरवाशीण स्त्रिया उत्सवाला जातात . खणा नारळांनी देवीची ओटी भरतात .
कोरगाव हे छोटेसे खेडेगाव असले तरी नैसर्गिक व आर्थिक दृष्टीने आज ते संपन्न व विकसनशील गाव आहे . आजही लोक शेती ,बागायती करतात व पर्यटनावर आधारित छोटे छोटे उद्योगधंदे करतात . वाहतुकीच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत . त्यामुळे लोक सधन आहेत .
निसर्गाने नटलेल्या या पवित्र भूमीला प्रत्येकाने कधी ना कधी भेट दिली पाहिजे. प्रेमळ दिलखुलास मनाच्या गोव्यातील लोकांचा पाहुणचार घेतला पाहिजे.
*या या गोया या गोया या*
*दर्यार सगळी वचाया*
*बांगड्याचा तिकला खावया*
*यळेच्या पाणयात पेवया*
*कोंकाणी उलवया*
*गोयाचो पावणेचार घेवया*
*🖊️© सौ.आदिती धोंडी मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*
मो. नं -9404395563
7744850670