मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहचणा्रा चौथा संघ
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएल २०२३ च्या ७० व्या अर्थात अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने पाच गडी गमावून १९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.१ षटकांत चार गडी गमावून १९८ धावा केल्या आणि सामना जिंकला. बंगळुरूकडून विराट कोहलीने नाबाद १०१ धावांची खेळी केली. त्याचवेळी गुजरातकडून शुभमन गिलने नाबाद १०४ धावांची खेळी केली.
आयपीएल २०२३ मधील आरसीबीचा प्रवास गुजरातविरुद्धच्या पराभवाने संपुष्टात आला. आता एलिमिनेटर सामन्यात लखनौचा सामना मुंबईशी होणार आहे. त्याचवेळी पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातचा सामना चेन्नईशी होणार आहे. प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचण्यासाठी आरसीबीला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता, पण कोहलीच्या संघाला तसे करता आले नाही आणि प्लेऑफमधून बाहेर पडला.
पावसामुळे नाणेफेकीला ४५ मिनिटे उशीर झाला. सामना ७:३३० च्या नियोजित वेळेपेक्षा ५५ मिनिटे उशिरा सुरू झाला, परंतु सामन्यात एकही षटक कमी झालं नाही. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोहली आणि डुप्लेसिसने सावध सुरुवात केली कारण खेळपट्टीने पावसामुळे वेगवान गोलंदाजांना मदत केली आणि दोघांनी दोन षटकात १० धावा केल्या. डूप्लेसिसने तिसऱ्या षटकात शमीला लक्ष्य केले आणि त्याच्या षटकात चार चौकार मारून धावगती वाढवली. त्याच्या षटकात १६ धावा आल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात कोहलीने यशच्या पहिल्या तीन चेंडूंवर लेग साइडमध्ये चौकार मारून हात मोकळे केले. त्यानंतर डूप्लेसिसने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला. राशिद खानने पाचव्या षटकात १० आणि सहाव्या षटकात नूर अहमदने ९ धावा दिल्या. दोघांनी पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकात ६२ धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीसाठी विराट कोहली आणि फॅफ डुप्लेसिस यांनी पहिल्याच षटकापासूनच चांगल्या गतीने धावा काढण्यास सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये दोघांनी मिळून ६२ धावा केल्या. यानंतर डूप्लेसिस २८ धावा करून नूर अहमदचा बळी ठरला, पण कोहली खंबीरपणे उभा राहिला. डूप्लेसिसनंतर मॅक्सवेलही अवघ्या पाच चेंडूत १११ धावा करून राशीद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. लोमरोर एक धाव घेतल्यानंतर बाद झाला आणि आरसीबीची धावसंख्या ८५/३ झाली. यानंतर मायकेल ब्रेसवेलने कोहलीसोबत ४७ धावांची भागीदारी करत आपल्या संघाचे आव्हान सामन्यात पुन्हा उभे केले. यादरम्यान कोहलीने आपले अर्धशतकही पूर्ण केले. मोहम्मद शमीने २६ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर ब्रेसवेलला बाद केले. यानंतर दिनेश कार्तिक पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अखेर विराट कोहलीने अनुज रावतसोबत नाबाद ६४ धावांची भागीदारी करत आरसीबीची धावसंख्या पाच बाद १९७ पर्यंत नेली. अनुजने १५ चेंडूत नाबाद २३ धावा केल्या. गुजरातकडून नूर अहमदने दोन गडी बाद केले. मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
विराट कोहलीने या सामन्यात ६१ चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी केली. त्याने १३ चौकार आणि एक षटकार लगावला. आयपीएलमधील विराटचे हे सातवे शतक होते. यासह त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकले. विराटने सलग दुसऱ्या डावात शतक झळकावले आणि अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. २०२० मध्ये शिखर धवन आणि २०२२ मध्ये जोस बटलर यांनी ही कामगिरी केली आहे. विक्रमांसाठी खेळणार्या विराट कोहलीचं शतक संघासाठी मात्र कुचकामी ठरलं. त्याचे शतकही सामन्यातील संथ शतक ठरले. विराट कोहलीनेही या मोसमात १४ सामन्यात ६३९ धावा केल्या. विराटची सरासरी ५३.२५ आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट १३९.८२ आहे. त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. त्याने तिसऱ्यांदा एका मोसमात ६०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी त्याने २०१३ आणि २०१६ मध्येही असेच केले होते.
१९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात काही खास नव्हती. वृद्धिमान साहा १४ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. यानंतर विजय शंकरने गिलसह गुजरातचा डाव सांभाळला आणि पॉवरप्लेमध्ये संघाला ५१ धावा करता आल्या. विजय शंकर आणि शुभमन गिल यांच्यातील दुसर्या विकेटसाठी १२३ धावांच्या भागीदारीने गुजरात संघाला सामन्यात पुनरागमन केले. विजय शंकर ३५ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला. यानंतर दासून शनाकाही खाते न उघडता तंबूमध्ये परतला. डेव्हिड मिलरलाही केवळ चार धावा करता आल्या. गुजरातने २३ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या आणि कदाचित हा संघ सामना गमावेल असे वाटत होते, परंतु गिलकडे इतर योजना होत्या. तो एका टोकाला चिकटून राहिला आणि वेगाने धावा काढत राहिला. त्याने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचून आपले शतक पूर्ण केले आणि संघाला विजय मिळवून दिला. गिलने ५२ चेंडूंत पाच चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने नाबाद १०४ धावा केल्या. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने दोन बळी घेतले. विजयकुमार आणि हर्षलला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
शुभमन गिलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
आयपीएलच्या १६व्या हंगामात साखळी फेरीचे सामने संपले. ७०व्या सामन्यांनंतर प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. या पराभवानंतर आरसीबी संघ स्पर्धेतून बाहेर पडला. त्यांचे प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले. मुंबई इंडियन्सने आरसीबीच्या पराभवाचा फायदा घेत अंतिम-४ मध्ये आपले स्थान निश्चित केले.
प्लेऑफच्या क्वालिफायर-१ मध्ये २३ मे रोजी संध्याकाळी ७:३० वाजता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. यानंतर चेन्नईतच २४ मे रोजी संध्याकाळी ७:३० वाजता मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. २६ मे रोजी संध्याकाळी ७:३० वाजता क्वालिफायर-२ हा क्वालिफायर-१ मध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ यांच्यात खेळवला जाईल. या सामन्यातील विजयी संघ क्वालिफायर-१ च्या विजेत्याशी अंतिम सामना २८ मे रोजी खेळेल. शेवटचे दोन्ही सामने गुजरात येथे होणार आहेत.