*चेन्नईची दिल्लीवर ७७ धावांनी मात; १७ गुणांसह प्लेऑफ गाठले; ऋतुराज-कॉनवेने ठोकले अर्धशतक*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएल २०२३ च्या ६७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनीला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची भेट दिली. चेन्नईने शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ७७ धावांनी पराभव केला आणि प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला. चेन्नईच्या २२३ धावांच्या प्रत्युत्तरात दिल्लीने नऊ गड्यांच्या मोबदल्यात १४६ धावा केल्या. हा सामना दिल्लीत होता, पण धोनी स्टेडियममध्ये पूर्ण जोमात होता. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियम सात नंबरच्या पिवळ्या जर्सींनी सजले होते. धोनीनेही निराश केले नाही. या मोसमात तो प्रथमच चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी उतरला. धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा या मोसमात स्टेडियममध्ये असा आवाज कधीच ऐकला नव्हता. त्याच्या वाट्याला केवळ चार चेंडू आले आणि तो पाच धावांवर नाबाद परतला. चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार म्हणजे त्यांची सलामी जोडी डेव्हॉन कॉनवे (८७) आणि ऋतुराज गायकवाड (७९) यांच्यातील ८७ चेंडूत १४१ धावांची भागीदारी.
धोनीने नाणेफेक जिंकून संध्याकाळी पडणारे दव लक्षात घेऊन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गायकवाड आणि कॉनवे यांनी धोनीला अजिबात निराश केले नाही. दोघांनीही आपला फॉर्म कायम ठेवत पहिल्या पाच षटकांत अर्धशतकी भागीदारी केली. सर्वप्रथम गायकवाडने ३७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या १० षटकात ८७ धावा झाल्या, पण चेन्नईची एकही विकेट पडली नाही. यानंतर दोघांनी लगेच धावांचा वेग वाढवला. १२व्या षटकात गायकवाडने कुलदीप यादवला सलग तीन षटकार ठोकत चेन्नईची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली.
१४व्या षटकात दोघांनीही संघाची धावसंख्या १४० धावांपर्यंत नेली. १० षटकांनंतर, दोघांनी पुढील चार षटकांत ५३ धावा करत चेन्नईच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यादरम्यान कॉनवेने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. १५व्या षटकात चेतन साकारियाने गायकवाडला ७९ धावांवर बाद करत ही भागीदारी भेदली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गायकवाडने ५० चेंडूत तीन चौकार आणि सात षटकार मारले. त्यानंतर कॉनवेने शिवम दुबेसोबत २१ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. दुबेने नऊ चेंडूंत तीन षटकारांच्या मदतीने १९ धावा केल्या. कॉनवे ५२ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ८७ धावा काढून बाद झाला. अखेरीस जडेजाने सात चेंडूंत २० धावांची नाबाद खेळी खेळली आणि चेन्नईने तीन गड्यांच्या मोबदल्यात २२३ धावा केल्या. दिल्लीमधली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आणि या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या होती.
२२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉला (५) दुसऱ्याच षटकात रायडूने अप्रतिम झेल टिपत बाद केले. पाचव्या षटकात दीपक चहरने सलग दोन चेंडूंवर फिल सॉल्ट (३) आणि मागील सामन्यातील हिरो रिले रोसो (०) यांना बाद करून दिल्लीला मोठा धक्का दिला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर एका बाजूने किल्ला लढवत होता, पण त्याला साथ मिळू शकली नाही. यश धुल (१३) ही ११व्या षटकात जडेजाचा बळी ठरला. अक्षरने आठ चेंडूंत झटपट १५ धावा केल्या, पण चहरने त्याला बाद केले.
वॉर्नरने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान जडेजाच्या षटकात २३ धावा काढल्या, ज्यामध्ये वॉर्नरने चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटी ५८ चेंडूत ८६ धावा करून तो बाद झाला. त्याने सात चौकार आणि पाच षटकार मारले. वॉर्नर बाद होण्यापूर्वीच दिल्लीचा पराभव निश्चित झाला होता. शेवटी दिल्ली संघाला केवळ १४६ धावाच करता आल्या आणि सामना गमवावा लागला. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक तीन बळी घेतले. मथिशा पाथिराना आणि महेश तिक्षणाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तुषार आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
चेन्नईच्या डेव्हॉन कॉनवेचं ह्या मोसमातील हे सहावं तर ऋतुराज गायकवाडचं तिसरं अर्धशतक ठरलं. तर डेव्हिड वॉर्नरचंही हे सहावं अर्धशतक ठरलं. तिन्ही फलंदाजांनी एकही शतक झळकावलं नाही. दिल्लीकडून खेळताना डेव्हिड वॉर्नरने १४ सामन्यांत ५१६ धावा काढल्या. दिल्लीचा संघ साखळीतच बाद झाला.
ऋतुराज गायकवाडला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.