You are currently viewing लक्ष्मीच धावली सरस्वतीच्या मदतीला…!

लक्ष्मीच धावली सरस्वतीच्या मदतीला…!

लक्ष्मीच धावली सरस्वतीच्या मदतीला…!

विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देवून त्यांना समाज विकासात योगदान देण्याच्या उद्देशाने अधिक सक्षम करण्यासाठी समाजात अनेक शिक्षण संस्था आहेत पण ,यातील मोजक्याच संस्था ज्ञानदानाचे पवित्र कार्य अगदी व्रतस्थपणे करीत आहेत ,असे आता अगदी छातीठोकपणे आणि दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. बाकीच्या शिक्षणसंस्था केवळ प्रतिष्ठा जपतानाच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या नावांखाली पालकांची डोनेशन किंवा विविध पध्दतीने आर्थिक पिळवणूक करतातच पण नितीमुल्यांशी देखील प्रतारणा करतात ,याचे अनेक किस्से दरवर्षी नव्या शैक्षणिक वर्षाला ऐकायला मिळतात.असाच एक किस्सा मागील काही वर्षांपूर्वी इचलकरंजी शहरात अनुभवायला मिळाला. सगळीकडे कोरोनाच्या संकटामुळे जनता हैराण होवून चिंतेत सापडली आहे. तसेच बहुतांश उद्योगधंदे व व्यवसाय अजूनही सुरळीत सुरु न झाल्याने पुरेशा रोजगाराअभावी अनेक कुटूंबाना दोन वेळच्या जेवणाची अडचण चिंतेत अधिकच भर घालणारी ठरत आहे.अशी विदारक परिस्थिती असताना काही शिक्षणसंस्थांना मात्र नव्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक कमाई करण्याची बरीच घाई लागलेली दिसत आहे.एका शिक्षणसंस्थेने तर प्रवेश देताना चालू वर्षातील शैक्षणिक फी पालकांकडून पूर्ण भरुन घेवूनच विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करणार असल्याचे सांगितले होते .यामध्ये संबंधित संस्थेने कोरोनाच्या संकटामुळे समाजात उदभवलेली आर्थिक टंचाईच्या परिस्थितीचा आणि अजून शाळा सुुुरु व्हायला अजून बराच कालावधी आहे ,याचा जराही विचार केेला नव्हता.एकीकडे पोटाला खायला वांदे असताना दुसरीकडे काही शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी वर्षाची शैक्षणिक फी आगाऊ भरुन घेण्याचा नियम काढून असंवेदनशील आणि व्यवहारीपणाचे दर्शन घडवत आहेत.त्यामुळे अनेक पालकांना नाईलाजाने काहीतरी पैशाची व्यवस्था करुन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा लागत आहे. पण,यातून संबंधित शिक्षणसंस्थेला माणुसकीपेक्षा पैसा कमावण्याची लागलेली घाई ही खरंच माणुसकीला काळीमा फासणारी आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरु नये.
नुकताच एका पाल्याच्या आईने काळजावर मोठा दगड ठेवून पैशाची मोठी अडचण असताना देखील केवळ आपल्या मुलाला शैक्षणिक प्रवेश मिळावा म्हणून चक्क लक्ष्मीपुजेसाठी वापरण्यात येणारे पैसे आणून ते संबंधित शिक्षणसंस्थेच्या व्यवस्थापनाकडे भरले आहेत. त्यामुळे त्या पाल्याचा शैक्षणिक प्रवेश आता कुठे निश्चित झाला आहे.यातून पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची असलेली चिंता तर दिसून येतेच ,याशिवाय या घटनेतून अखेर लक्ष्मीच धावली सरस्वतीच्या मदतीला,असेही आता खेदाने म्हणावे लागत आहे.खरंतर , संबंधित
शाळा व्यवस्थापनाने कोरोनामुळे निर्माण झालेल्या
समाजातील भिषण आर्थिक परिस्थितीचा विचार करुन शाळा सुरु झाल्यानंतर लगेचच पालकांकडून शैक्षणिक वार्षिक फी जमा करुन घेण्याची कार्यवाही केली असती तर त्याला कुणाचाच विरोध असण्याचे काहीच कारण नव्हते.पण ,याचा थोडासाही विचार न करताच असंवेदनशील आणि केवळ व्यावहारिक बनून सुरु ठेवलेला हा गैरप्रकार निश्चितच पवित्र समजल्या जाणाऱ्या शैक्षणिक क्षेत्राला शोभणारा नाही.जर एका पाल्याची आई अक्षरशः डोळ्यात पाणी आणून लक्ष्मीपुजेचे पैसे फीसाठी भरत असेल आणि त्याचे संबंधित शाळा व्यवस्थापनाला काहीच वाटत नसेल तर ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे ,असेच आता धाडसाने म्हणावे लागेल.हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहे…अशाच अनेक वाईट अनुभवातून गेल्याशिवाय अनेक पालकांच्या पाल्याचा शैक्षणिक प्रवेश निश्चित होणार नाही ,ही गंभीर परिस्थिती हल्लीची शिक्षणव्यवस्था ही आता ज्ञानसंस्कार देण्याच्या उद्देशापासून कोसोदूर लांब जावून केवळ आर्थिक फायद्याचे धोरण अवलंबण्यात धन्यता मानत आहे , हे अधोरेखित करणारी आहे. त्यामुळे डोनेशन किंवा आगाऊ शैक्षणिक फी भरुन घेणे ,यासारख्या गैरप्रकारांना वेळीच चाप लावण्यासाठी सरकारमधील संबंधित प्रशासनाने वेळीच आपले कर्तव्य बजावण्याची तत्पर भूमिका घेतली तरच शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि सक्षमीकरण होवून निकोप समाजासाठी सुसंस्कृत भावी पिढी घडण्याची आशा बाळगता येणार आहे ,एवढे मात्र निश्चित…!

– सागर बाणदार
इचलकरंजी

प्रतिक्रिया व्यक्त करा