You are currently viewing नातं अश्रूंचं..

नातं अश्रूंचं..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*नातं अश्रूंचं*

 

त्यादिवशी माझी मदतनीस निर्मला मला म्हणाली,” ताई आताशा मले रडाया बी येत नाय. इतकं दुःख पेललंय् की डोळ्यातलं सारं टिप्पूस पार सुकूनच गेलय बगा.”

ती इतकी सहज आणि निर्विकारपणे हे उद्गारली की तिच्या वक्तव्याने माझ्या डोळ्यातून टपकन अश्रू ओघळले. आणि त्याच क्षणी जाणवलं तिच्या कोरड्या डोळ्यांशी माझं अश्रूंचं एक कणवेच नातं होतं. एक स्त्रीत्वाचा जाणता गहिवर होता.

असे कित्येक अश्रू मी माझ्या हृदयात सांभाळून ठेवलेत. कारण त्यांच्याशी माझं खोल नातं आहे.

अश्रू आनंदाचे, अश्रू दुःखाचे, वियोगाचे, भेटींचे, निरोपाचे, कधी ते केवळ आपल्याशी संबंधित तर कधी अवाढव्य पसरलेल्या या जगात कुणाकुणाच्या डोळ्यातून वाहताना पाहिलेले, अनपेक्षित आणि साक्षी भावाने. त्या त्या वेळी त्या अश्रूंविषयी उमटलेल्या भावनांशी माझ्या अस्तित्वाचा, माझ्या सजीवतेचा दाखला देणारं नातं नक्कीच होतं. त्या साऱ्यांचे फायलिंग माझ्या अंतःकरणात वेळोवेळी झालेलं आहे.

माझ्या आजीचं हार्नीयाचं ऑपरेशन होतं. १९५६ साल असेल ते. त्यावेळी शल्यशास्त्र आजच्या इतकं प्रगत नव्हतं. माझे पपा अत्यंत अस्वस्थ, व्याकूळ होते. पपांनी आम्हा साऱ्यांसाठी त्यांच्या डोळ्यातलं पाणी बांधून ठेवलं होतं. पण जेव्हा डॉक्टर ओ.टी. मधून बाहेर आले आणि पपांचे हात हाती घेऊन म्हणाले,” डोन्ट वरी. ऑपरेशन ईज सक्सेसफुल. ”

हे ऐकल्यावर माझे पपा भवताल विसरून ढसढसा रडले.इतका वेळ धरुन ठेवलेला चिंतेचा लोंढा अश्रुंच्या रुपात वहात होता. त्या अश्रूंच्या पावसात मीही भिजले. वास्तविक तो क्षण किती आनंदाचा, तणाव मुक्ततेचा होता! पण त्यावेळी जाणवलं होतं ते मात्र माय लेकाचं घट्ट नातं! ते त्या अश्रुंमध्ये मी पाहिलंं आणि माझ्या मनात कायम रुजलं.

अगदी आजही रणजीत देसाईंची “स्वामी” कादंबरी वाचताना शेवटचा— रमा सती जातानाचा जो प्रसंग आहे तो वाचताना माझ्या डोळ्यात पाणी येतच. हे अश्रू म्हणजेच त्या प्रसंगाशी, त्या शब्दांशी जुळलेलं एका वाचकांचं नातं असतं.

 

गीत रामायणातलं सीतेच्या मुखातलं

मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे?

पती चरण पुन्हा मी पाहू कुठे?

हे गाणं आणि तिने फोडलेला टाहो ऐकून ज्याचे हृदय आणि डोळे भरून येणार नाहीत तो माणूसकुळातलाच नाही असेच मी म्हणेन. कारण माणसाच्या संवेदनशील मनाशी अश्रूंचं थेट नातं असतं. ते सदा वाहत असतं, वारंवार जाणीव करून देणार असतं.

पु.लंचे चितळे मास्तर जेव्हा म्हणतात,” अरे पुर्षा! आमच्या डोळ्यातच मोतीबिंदू असणार. खरे मोती आम्ही कुठे पाहणार?”

असं अल्प शब्दातलं पण इतकं खरं दारिद्र्याचं स्वरूप पाहताना डोळे पाझरणारच ना?

माणूस दुःखातच रडतो असं नाही सुखातही ओलावतो. शब्दात, कथेत, गाण्यात, अपयशात आणि यशातही ओलावतो. शिखरावर पोहचल्यानंतर माथ्यावरच्या आकाशाकडे तो साश्रु नयनाने पाहतो. ते अश्रु काहीतरी साध्य केल्याचं समाधान देणारे असतात. ब्रह्वपुत्रा नदीचे विस्तीर्ण पात्र पाहताना त्या दिव्यत्वाच्या तेजानेही मी पाझरले. हीअशी अव्यक्त नाती फक्त अश्रुच व्यक्त करतात.नि:शब्दपणे.जिथे शब्द संपतात तिथूनच अश्रूंचं नातं सुरु होतं.

वीस-बावीस वर्षांनी जेव्हां मी माझ्या मावस भावाला अमेरिकेत भेटले तेव्हा कितीतरी वेळ आम्ही एकमेकांशी बोलूही शकलो नाही. नुसते डोळे वाहत होते आणि वाहणाऱ्या डोळ्यातून आमचं सारं बालपण पुन्हा पुन्हा दृश्यमान होत होतं. एका रम्य काळाचं प्रतिबिंब त्या अश्रूंच्या पाण्यात उमटलं होतं. हे लिहिताना आताही या क्षणी माझे डोळे ओलावलेले आहेत.

नात्यातल्या प्रेमाची एक खरी साक्ष हे अश्रूच देतात.

एकदा आमच्या घरी काम करणाऱ्या गणूला एक पत्र आलं होतं. त्याने ते वाचलं, डोळे पुसले आणि पत्राची पुन्हा घडी करून ठेवली. मला वाटलं काहीतरी दुःखद घटना घडली असावी गणूच्या गावी. म्हणून मी चौकशी केली तेव्हा त्याने आढेवेढे घेतले आणि मग तो हळूच म्हणाला,” माझ्या कारभारणीचा कागद हाय.” आणि तो कागद त्याने माझ्या हातात दिला. मी तो उलगडला तर काय एका कोऱ्या कागदावर ओल्या थेंबामुळे पुसलेली एक आडवी रेष होती फक्त. मी गणू कडे पाहिलं तेव्हा तो इतकंच म्हणाला, “तिला लिवता वाचता येत नाय.” डोळ्यातल्या थेंबाने पुसलेली रेष जणू हेच सांगत होती का? “तुमची भारी सय येते धनी.” वाह! क्या बात है!

एका कागदावर एक सुकलेला अश्रू अंतःकरणातल्या खोल भावनाही किती सुंदरपणे व्यक्त करू शकतो!

” गड आला पण सिंह गेला!” हे म्हणताना तो युगपुरुषही अश्रूंना थोपवू शकला नव्हता. त्या स्वामीभक्ताला प्रत्यक्ष स्वामींनी दिलेली ही साश्रु मानवंदना इतिहासात कोरली गेली.

अनेक प्रसंग अश्रूंच्या माध्यमातून असे कोरले गेले आहेत.

आमच्या एका मित्राने मृत्यूशी अचाट झुंज देऊन जगाचा निरोप घेतला. त्याचा लोकसंग्रह, लोकप्रियता अफाट होती. त्याच्या अंत्य दर्शनाला सारा गाव लोटला होता पण हा माणूसप्रिय आत्मा शांत पहुडला होता. त्याची पत्नी शांत होती. स्वतःला सावरत होती. वयाच्या अठराव्या वर्षापासूनच्या जीवनसाथीला निरोप देणं किती कठीण होतं! पण तो एक क्षण माझ्या मनात घर करून आहे. खूप प्रेमाचं नातं होतं त्यांचं. तसं परिपूर्ण आयुष्य दोघांनी जगलं होतं. जेव्हां त्याच्या निर्वाणाची वेळ आली तेव्हां तिच्या डोळ्यातून गळलेला अश्रू त्याच्या स्थिर निश्चल पापणीवर ओघळला आणि त्याच क्षणी त्याचा देह चार खांद्यावर विसावला. त्यावेळी माझ्या मनात आलं हा सारं वैभव इथेच ठेवून गेला पण जाताना पत्नीच्या प्रेमाचा एक अश्रू मात्र सोबत घेऊन चाललाय. त्या अश्रूशी त्याचं असलेलं नातं चिरंतन होतं.

आमच्या आईनेही जाताना शेवटच्या क्षणी आम्हा पाची बहिणींना जवळ घेतलं आणि एवढेच म्हणाली,” मी तृप्त आहे. माझी जीवनाविषयी कोणतीही तक्रार नाही. तुम्ही साऱ्या सुखी रहा. शोक करु नका. ” बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. निरोपाचाच तो क्षण. तिचा एक एक अश्रू म्हणजे जीवनातल्या मूल्यांचा,संस्काराचा एक एक मोती होता. जगातले सारे मोती एकत्र केले ना तरी या एका अश्रूच्या थेंबांची किंमत त्यांना लाभणार नव्हती. तो एका स्त्रीचा, आईचा अश्रू होता. महान, शक्तिमान. तिची शक्ती त्या अश्रूंच्या माध्यमातून जणू आमच्यात झिरपत होती.

तेव्हा हे असं आहे अश्रूंचं नातं.

आता नक्राश्रू, रुदालीचे अश्रू, मोले घातले रडाया या शब्दप्रयोगांना आपण तूर्तास तरी दूर ठेवूया आणि अश्रूंशी जीवनभर असलेल्या नात्याला रचनात्मक रितीने स्मरूया.

 

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा