साहिर म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाचा अध्याय : प्रा.डाॅ.मृदूला दाढे जोशी
इचलकरंजी : प्रतिनिधी
“साहिर लुधियानवी हा हिन्दी चित्रपट संगीतातील एक अतिशय महत्वाचा आणि मानाचा अध्याय आहे. अतिशय संवेदनशील कवी त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध व भांडवलशाही विरुद्ध जीव तोडून लिहिणारा कवी ही दोन्ही रूपं साहिरमध्ये दिसतात. मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है… असं जरी साहिरने लिहिलं असलं तरी साहिर हा एक अविस्मरणीय शायर आहे. त्याच्या गाण्यात आणि कवितांमध्ये आपण जितकं खोलवर शोधत जाऊ तितकं नवीन काहीतरी सापडत जातं. म्हणूनच साहिर हा हिंदीमधील एक श्रेष्ठ शायर आहे.” अशा आशयाचे प्रतिपादन प्रसिद्ध गायिका व चित्रपट संगीत अभ्यासक प्रा.डॉ. मृदुला दाढे जोशी यांनी केले. येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी आपला साहिरनामा हा कार्यक्रम सादर करताना त्या बोलत होत्या.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने सदरची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून उपक्रमाचे हे ४५ वे वर्ष आहे. सुरुवातीला शामसुंदर मर्दा यांच्या हस्ते पाहुण्यांचे गुलाब पुष्प प्रदान करुन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अविनाश होगाडे यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संजय होगाडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. समीर गोवंडे यांनी करून दिला.
आपल्या दोन तासांच्या, रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवणा-या कार्यक्रमात मृदुलाताईंनी साहिरच्या प्रतिभेचा आढावा घेतला, त्याचबरोबर त्यांची काही गाणी सादर केली आणि काही गीतांची झलक पेश केली तर आपले मुद्दे स्पष्ट करण्यासाठी काही चित्रपट गीते मोठ्या पडद्यावर दाखवली. सुरुवातीच्या काळातील साहिरची कविता तडफदार आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी होती. सामाजिक भान असलेल्या या कवीमुळे चित्रपटातील गीतेही अर्थपूर्ण असतात आणि त्यांना काव्यमूल्य असते हे प्रकर्षाने जाणवलं. त्यांच्या लेखणीत जितकी आग आहे, उपरोध आहे, तितकीच कोमलता आहे. तरल हळव्या भावनांना लेखणीचा स्पर्श झाल्यावर अनुपम काव्य जन्माला आलं आणि संगीतकारांनी तेवढ्याच ताकदीची स्वरयोजना करून त्यातल्या अनेक छटा उलगडून दाखवल्या. असे मृदुलाताई कार्यक्रमात म्हणाल्या.
“साहिरच्या लिखाणात अन्यायाविरुद्ध जाणवणारी चीड आहे तितकाच एक अत्यंत हळवा प्रियकरही आहे, स्त्रीची घुसमट, आईचं वात्सल्य व्यक्त करताना खरोखर स्त्रीच्या हृदयापर्यंत जाणारा, पराकोटीचा हळवा पुरुष साहिरमध्ये दिसतो.” अशा प्रकारचे उदगार मृदुलाताईंनी काढले. साहिर या अतिशय व्यामिश्र शैलीच्या कवीच्या रचनांचा आस्वाद घेत, त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये सांगत अनेक गाण्यांचे अतिशय सुंदर सादरीकरण करीत त्यांनी ही मैफल रंगवली आणि रसिकांना आनंद दिला.
संगीतकारांनी साहिरच्या रचनांना कसा न्याय दिला, गायकांनी ते काव्य आपल्या गायकी ने कसं खुलवलं ? यावर सोदाहरण सादरीकरण मृदुलाताईंनी केले. साहिरचा उपरोध, त्याची प्रणयगीतं लिहितानाची तरलता, हे सगळं त्यांनी कार्यक्रमातून दाखवलं. सलामे हसरत कबूल करलो, तूम अपना रंजओगम, एरी गाने ना दुंगी, आगे भी जाने ना तू… अशी काही गाणी त्यांनी यावेळी सादर केली तर अनेक गीतांची छोटी छोटी झलक सादर करुन साहिरच्या गाण्यांची वैशिष्ट्ये त्यांनी दाखवली.
साहिर या विलक्षण ताकदीच्या कवीच्या रचनांचा जाणकारीने आस्वाद घेणारी एक संस्मरणीय मैफल मृदुलाताईंनी आपल्या ओघवत्या वाणीने त्याचबरोबर सुरेल गायकीने अत्यंत ताकदीने रसिक श्रोत्यांपर्यंत पोहचवली. कार्यक्रमाच्या शेवटी साहिर यांचे, वो सुबह कभी तो आयेगी हे अतिशय सुंदर आणि तितकेच अर्थपूर्ण गीत सादर करून आपल्या कार्यक्रमाची सांगता केली. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.