काव्यगुरू श्री.विजय जोशी (विजो) यांनी केलं मार्गदर्शन
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी आणि देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय प्रत्यक्ष कार्यशाळा रविवार दिनांक १४ मे रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत सावंतवाडी येथे घेण्यात आली. सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या कार्यशाळेस काव्यगुरू-कवी-गझलकार विजय जोशी (विजो) (डोंबिवली, मुंबई ) यांनी मार्गदर्शन केलं. विजो सरांच्या शिकविण्याच्या पद्धतीवर सर्वच कार्यशाळा सदस्यांनी समाधान व्यक्त करून पुन्हा पुन्हा आपण कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करावे अशी इच्छा व्यक्त केली.
कार्यशाळेच्या सुरुवातीस स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त छ.संभाजी महाराजांच्या प्रतिमेला गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. काव्यगुरू विजय जोशी यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कवी विजय जोशी, देशभक्त गव्हाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तालुकाध्यक्ष संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रतिभा चव्हाण, कार्यकारणी सदस्य कवी दीपक पटेकर, मेघना राऊळ, आश्लेषा पारकर, रामदास पारकर, सहसचिव राजू तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक ॲड.संतोष सावंत यांनी ही कार्यशाळा घेण्यास कवी दीपक पटेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे स्पष्ट केले. दरवर्षी आम्ही नवोदित कवी घडवण्याच्या दृष्टीने अशी चळवळ उभारली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य यशोधन गवस म्हणाले कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांनी ही कार्यशाळा घेऊन निश्चितच चांगले काम केले आहे, विजय जोशी यांनी पुन्हा या भागात यावे आणि निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातील असे स्पष्ट केले. कवी दीपक पटेकर यांनी वृत्तबद्ध कविता लिहिताना कोणीही चुका सांगितल्या तर वाईट वाटून न घेता त्यातून चांगले ते घ्यावे, कारण सांगणारे कोणीही माहिती नसताना सांगत नाहीत. कवी हा नेहमीच विद्यार्थी असतो, कायम शिकत राहतो असे प्रतिपादन केले. यावेळी नकुल पारकर, प्रतिभा चव्हाण, रामदास पारकर, दिलीप भाईप, डॉ. गौरी गणपत्ये, मेघना राऊळ, आदींनी मनोगत व्यक्त केले.
सावंतवाडीतील वृत्तबद्ध कविता ते गझल कार्यशाळेत कवी विजय जोशी यांनी मात्रा म्हणजे काय? त्या कशा मोजतात..? आणि त्याचा सराव घेण्यात आला. वृत्त म्हणजे काय..? मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त, अक्षरछंद यांची प्रत्यक्ष सखोल माहिती देण्यात आली आणि वृत्तांचा सराव घेल्यात आला. वृत्तांची माहिती झाल्यावर हळूहळू गझल शिकण्याकडे नवोदितांचा ओढा असतो. या बाबींचा विचार करून विजो सरांनी गझलतंत्र आणि गझलांचा बेसिक गोष्टींचा सराव घेण्यात आला. या एकंदर कार्यशाळेत शब्दांच्या मात्रा ओळखणे पासून सुरू झालेला प्रवास ओळींतील मात्रा ओळखणे, अक्षरच्छंद मधील अभंग सारखे प्रकार ज्यात मात्रा किंवा लघु गुरू हा प्रश्न नसतो यावर सविस्तर मार्गदर्शन केलं. अक्षरगण वृत्तातील लघु गुरू क्रम, लगावली इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली. वृत्तपत्र कवितेचे सविस्तर प्रकार उदाहरणासहित शिकविले. वृत्तविषयक संकल्पना स्पष्ट केल्या. कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थीनी प्रश्नोत्तरे विचारून कार्यशाळेत ज्ञानार्जन केलं आणि सर्व शंका कुशंकांवर खुली चर्चा केली.
कार्यशाळेतील उपस्थितांचा वेगळा व्हाट्सप समुह बनवून तिथे जवळपास पुढील दोन महिने विविध वृत्तातील कविता, गझल रचना यांचा सराव आणि यासंबंधीचा इतर अभ्यास ऑनलाईन घेतला जाईल असे श्री.विजय जोशी यांनी सांगितले. कार्यशाळेत सहभागी सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून काव्यगुरू विजय जोशी देखील आनंदित झाले. सकाळी १० वाजता सुरू झालेली कार्यशाळा संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत उत्साहात सुरू होती.
सावंतवाडीत कार्यशाळेसाठी केवळ जिल्ह्यातून नव्हे तर गोवावरूनही कवी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, शिरोडा, कणकवली आदी ठिकाणांवरून कवी कवयित्री सहभागी झाले होते. त्यात अनुक्रमे चैताली चौकेकर, उज्वला कर्पे, श्रीम.देवयानी आजगावकर, अमीर सातार्डेकर, आश्लेषा पारकर, आदिती मसुरकर, राधिका कांबळी, मेघना राऊळ, स्नेहा नारिंगणेकर, अलका कांबळे, राजेंद्र गोसावी , डॉ.गौरी गणपत्ये, रितेश राऊळ, रामदास पारकर, कृष्णा गवस, दिलीप भाईप, श्रीम.चव्हाण, उज्वल सावंत, मालवणचे मधूकांत कद्रेकर, मडगाव येथील हनुमंत मावजो आदी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कोमसाप उपाध्यक्ष पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी केले.