*दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ; पंजाब मोठ्या विजयासह सहाव्या स्थानावर*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएल २०२३ च्या ५९ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला शनिवारी (१३ मे) पंजाब किंग्जविरुद्ध दणदणीत पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पंजाबने त्यांना ३१ धावांनी पराभूत करून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. यासोबतच दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. त्यांचे १२ सामन्यांत आठ गुण आहेत. बाकीचे दोन सामने जिंकले तरी त्याचे फक्त १२ गुण होतील. अशा स्थितीत त्यांना पुढील फेरी गाठता येणार नाही. दुसरीकडे पंजाबने या विजयासह गुणतालिकेत झेप घेतली आहे. त्यांना १२ गुण मिळाले असून ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने २० षटकांत सात गडी गमावून १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १३६ धावाच करू शकला. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक १०३ धावा केल्या. त्याचे हे आयपीएलमधील पहिले शतक आहे. आयपीएलच्या चालू मोसमात शतक झळकावणारा प्रभसिमरन हा पाचवा फलंदाज आहे. सनरायझर्स हैदराबादसाठी हॅरी ब्रूक, कोलकाता नाईट रायडर्ससाठी व्यंकटेश अय्यर, राजस्थान रॉयल्ससाठी यशस्वी जैस्वाल आणि मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादव यांनी शतकी खेळी केली. प्रभसिमरनशिवाय सॅम करण आणि सिकंदर रझा यांनाच दुहेरी आकडा पार करता आला. सॅम करणने २४ चेंडूत २० आणि सिकंदर रझाने सात चेंडूत नाबाद ११ धावा केल्या. शिखर धवन सात, जितेश शर्मा चार, लियाम लिव्हिंगस्टोन चार धावा करून तंबूमध्ये परतले. हरप्रीत ब्रार आणि शाहरुख खानने प्रत्येकी दोन धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून इशांत शर्माने सर्वाधिक दोन बळी घेतले. अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी लज्जास्पद कामगिरी केली. खराब फलंदाजीमुळेच संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीसाठी डेव्हिड वॉर्नरच टिकू शकला. त्याने २०० च्या धावगतीने २७ चेंडूत ५४ धावा केल्या. वॉर्नरने १० चौकार मारले. त्याच्या बॅटमधून एक षटकारही निघाला, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पॉवरप्लेमध्ये दिल्ली संघाने कोणतेही नुकसान न करता ६५ धावा केल्या होत्या. त्यानंतर आणखी ५० धावांची भर घालत संघाचे सहा फलंदाज बाद झाले. येथून संघाने पराभवाकडे वाटचाल केली. पंजाबच्या फिरकी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत दिल्लीच्या फलंदाजांना खेळपट्टीवर गार केले. दिल्लीकडून फिलिप सॉल्ट २१, अमन हकीम खान आणि प्रवीण दुबे यांनी प्रत्येकी १६ धावा केल्या. कुलदीप यादवने नाबाद १० धावा केल्या. या पाच फलंदाजांशिवाय दुहेरी आकडा कुणालाही स्पर्श करता आला नाही. रिले रुसो पाच, मिचेल मार्श तीन आणि अक्षर पटेल एका धावेवर बाद झाले. मनीष पांडे खाते उघडू शकला नाही. पहिल्या सहा षटकांत पंजाबच्या गोलंदाजांचे काही चालले नाही, पण पॉवरप्ले संपला आणि फिरकीपटू आले आणि त्यांनी वर्चस्व गाजवले. हरप्रीत ब्रार आणि राहुल चहरने धुमाकूळ घातला. हरप्रीत ब्रारने चार आणि राहुल चहरने दोन गडी बाद केले. शेवटच्या षटकात वेगवान गोलंदाज नॅथन एलिसने दोन बळी घेतले.
प्रभसिमरन सिंगला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.