तिराळी कालवा उपविभागाला घेराओ घालून विचारला जाब
दोडामार्ग
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळायला हवे असलेले पाणी नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरी मिळत नाही, यामुळे केलेली भात शेती तसेच नारळ, सुपारी आणि मुख्यत्वे केळी बागायती ही करपण्याच्या मार्गावर आहे, यासाठी ०६ नोव्हेंबरला पत्र देऊन लवकरात लवकर तिराळी धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी सुरू करा अशी मागणी घोटगे येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तिलारी कालवा विभागाकडे केली होती. मात्र याला तिराळी कालवा विभागाने केराची टोपली दाखवण्याचाच प्रकार केला होता अखेर आज या शेतकऱ्यांनी तिराळी कालवा विभागाला घेराव घालत जाब विचारला. यावेळी आपले पाणी मागणी पत्र आले नाही असे स्पष्टीकरण त्या ठिकाणी उपस्थित अभियंता श्री घाटगे यांनी देताच यावेळी उपस्थित आंदोलनकर्ते आक्रमक बनले. तुमचे आम्हाला काही म्हणणे ऐकायचे नाही आम्हाला वरिष्ठ अभियंता श्री आजरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्याकडून निर्णय येऊ दे त्यानंतरच आम्ही घेराओ मागे घेतो असे यावेळी आक्रमक बनून आंदोलनकर्त्यांनी सांगितल्यामुळे शेवटी साहाय्यक अभियंता श्री आजगेकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्यात आला. आज पासून कामास सुरुवात करतो दोन दिवसात घोटगे पंचक्रोशीला पाणी मिळेल असे आश्वासन फोनवरून याठिकाणी सहाय्यक अभियंता श्री आजरेकर यांनी दिले. यावेळी घेराव मागे घेण्यात आला.
मात्र ऐन हंगामात अशा आंदोलनांची वारंवार गरज पडत असेल तर नेमका कालवा विभाग करतोय तरी काय? हा प्रश्न मात्र या ठिकाणी अनुत्तरीतच राहताना दिसतो आहे. यावेळी आक्रमक होत ग्रामस्थांनी आपण पाणी सोडणार नसाल तर त्याठिकाणी तशा प्रकारचे सूचना फलक लावावा म्हणजे आम्ही पर्यायी व्यवस्था करू असे सांगितले.
यावेळी सेना जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस, शेतकरी भरत दळवी, सतिश परब, संदीप दळवी, संतोष गवस, विजय दळवी, सतिश दळवी, महेश दळवी, शंकर गवस, शंकर दळवी, श्रीराम दळवी, सहदेव दळवी, विद्यानंद दळवी, गुरुनाथ दळवी, बाळा दळवी आदी शेतकरी उपस्थित होते.