बेकायदा वाळू उपसा संदर्भात मनसे कडून तहसीलदार, प्रांताधिकारी यांना निवेदन सादर…
सावंतवाडी
येथील तहसिलदार कार्यालयात जावून प्रांताधिकारी खांडेकर व तहसिलदार म्हात्रे यांची मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे, शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, तालुका सचिव विठ्ठल गावडे, ओंकार कुडतरकर, शुभम सावंत, सुधीर राउळ, आकाश परब आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकार्यांनी निवेदन देवून दोन्ही अधिकार्यांचे लक्ष वेधले. या निवेदनात म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा केला जात आहे. आंबोली मार्गे कोल्हापुर-बांदा-सातार्डा मार्गे गोवा अशी बिनधिक्कत वाहतूूक सुरू आहे. याबाबत वेळोवळी लक्ष वेधून सुध्दा कोणीच दखल घेत नाही; महसूल प्रशासन याबाबत अनभिज्ञ कसे हे प्रश्नचिन्हच आहे. या घटनेची तात्काळ दखल घेऊन अवैध वाळू वाहतुकीवर दंडात्मक कारवाई करावी अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल व कोणताही अनुचित प्रकार घडल्यास महसूल प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या निवेदनातून देण्यात आला.
यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी त्या ठिकाणी असलेल्या दोघा अधिकार्यांनी वाळू माफीया तसेच व्यावसाय करणारे लोक आमच्यावर पाळत ठेवतात. आम्ही घरातून बाहेर पडलो की ते आपल्या सहकार्यांना आमच्या मार्गाची आणि गाडी नंबरची माहीती देतात. त्याच बरोबर काही व्यावसायिकांनी तर आमच्या गाडीवर आपल्या गाडया घालण्याचा प्रकार केला होता. त्यामुळे काही अंशी कारवाई करताना अडचणी येत आहे, असे सांगितले.
यावर अनिल केसरकर व गुरूदास गवंडे यांनी नाराजी व्यक्त केली असून चुकीच्या पध्दतीने महसुलचे अधिकारीच संबधित व्यावसायिकांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे असे करण्याचे त्यांचे डेअरींग होत आहे. महसुलच्या अधिकार्यांना जर भिती वाटत असेल तर त्यांनी पोलिस सुरक्षा घेवून त्या व्यावसायिकांची दादागिरी मोडीत काढावी, अशी मागणी केेली आहे. तर शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी अशा प्रकारे वाळू माफियांची दादागिरी सुरू असेल तर अधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी पार पाडू.