दिनांक ५ मे २०२३ सातारा(प्रतिनिधी) : –
साहित्य सेवा प्रज्ञा मंच आयोजित ८ वे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन, वेदभवन कार्यालय सातारा येथे कवयित्री सौ.विनिता कदम यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात पार पडले. यासाठी साहित्य सेवा प्रज्ञा मंचच्या संस्थापिका ज्येष्ठ कवयित्री सौ.लीनाताई देगलूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व समिती सदस्य डॉ.सुधाकर बेंद्रे, बंधूराज सुनिल ससाणे, सौ. भावना काळे, कल्पना शिंदे, स्नेहलता काळे, मीना राजपूत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सकाळी ८ वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. याप्रसंगी संमेलनाध्यक्षा सौ. विनिता कदम यांनी पालखीला खांदा देऊन दिंडीची सुरूवात केली. संस्थापिका लीनाताई देगलूरकर, संमेलनाध्यक्षा विनिता कदम, स्वागताध्यक्षा डॉ. मंदा घोरपडे, प्रमुख अतिथी डॉ. मंगल जाधव, डॉ. सुभाष कटकदौंड, प्रा. डॉ. चंदना लोखंडे, बापू दासरी, विवेक जोशी, इत्यादी मान्यवरांनी व्यासपीठाची शोभा वाढवली. यानंतर वेदभवन मधील विद्यार्थ्यांनी केलेल्या पवित्र मंत्रोच्चाराच्या जयघोषात प्रसन्न वातावरणात संमेलनाध्यक्षा तसेच प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन केले गेले. त्यानंतर ९ ते १० यावेळेत सारस्वतांनी नाश्ट्याचा आस्वाद घेतला. बरोबर १० वाजता प्रथम सत्राच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी श्री. किरण वेताळ यांनी स्विकारली.
प्रथम कवयित्री लीनाताई देगलूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आयोजक डॉ.सुधाकर बेंद्रे यांनी आपल्या मनोगतात लीनाताईंना स्वयं प्रकाशित चिंतामणी अशी उपाधी दिली. तसेच उदघाटक मिश्रांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि नंतर संमेलनाध्यक्षा सौ. विनिता कदम यांनी आपले अनमोल मनोगत व्यक्त केले. यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात साहित्य व त्याची समाजाला असणारी गरज , साहित्य संमेलनाचा उद्देश, महत्त्व तसेच समाज परिवर्तन काळाची गरज या महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला. दरम्यान या संमेलनाचे खास वैशिष्ट्य असे होते की सपत्नीक कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वर्षभर संस्थेसाठी निस्वार्थी सेवा देणारे कवी कवयित्री यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. इथे प्रथम सत्र संपले . १ ते २ यावेळेत सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर पुन्हा संमेलनाचे दुसरे सत्र सुरू झाले. यावेळी दुसऱ्या सत्राचे सुत्र संचालनाची जबाबदारी कर्नल शरदचंद्र पाटील यांनी स्वीकारली. तेव्हा काव्यवाचनाचा कार्यक्रम सुरू झाला. यासाठी प्रमोद सूर्यवंशी, भाग्यश्री खुटाळे, बालकवी कादंबरी गायकवाड, कवी अनिल देशपांडे , पल्लवी उमरे, विनिता कदम, सुधाकर बेंद्रे, अशा अनेक नामवंत कवींनी हजेरी लावली. त्याचवेळी काव्यस्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण लेखक कवी सन्माननीय श्री. चंद्रहास शेजवळकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी विविध विषयांवर सारस्वतांनी आपल्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी गझलांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी गझलसम्राट डॉ. राज रणधीर, डॉ. राजेंद्र केंगार, डॉ. सुभाष कटकदौंड, किरण वेताळ, कर्नल शरदचंद्र पाटील, लीनाताई देगलूरकर अशा अनेक गझलकारांनी गझल्स सादर करुन कार्यक्रम रंजक बनवला.
यानंतर काव्यस्पर्धेत विजयी झालेल्या ३ स्पर्धकांना रोख रकमेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. माणिक जाधव आणि डॉ.सुधाकर बेंद्रे यांनी तरुणांना लाजवेल असे उत्कृष्ट नियोजन केले होते. त्यांची कार्याबद्दलची आत्मीयता आणि समर्पकता वाखाणण्याजोगी होती.
संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सारस्वतांनी कार्यक्रमांची रंगत वाढवली. त्यामुळे पृथ्वीवर त्या दिवसापुरते स्वर्गीय सुखाचा सोहळा थाटामाटात पार पडला.