*उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मुंबईचे माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन; मातोश्रीवर शोककळा*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
शिवसेनेचे वरिष्ठ नेते, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे पहाटे दोन वाजता हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर मातोश्रीवर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव दुपारी २ वाजता सांताक्रुझ पूर्व येथील राजे संभाजी विद्यालय येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर दुपारी ४ वाजता त्यांची अंत्ययात्रा टीचर्स कॉलनी येथून स्मशानभूमीकडे निघेल.
मागच्या आठवड्यात ते गावाला होते. तिथून विश्वनाथ महाडेश्वर यांना मुंबई येऊन चार दिवस झाले होते. काल रात्री त्यांना त्रास जाणवू लागला, त्यावेळी त्यांना तात्काळ व्हि एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सहकार्यांनी दिली आहे. हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
विश्वनाथ महाडेश्वर यांचा जन्म १५ एप्रिल १९६० रोजी झाला. मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुसबे गावचे असणाऱ्या महाडेश्वर यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण सिंधुदुर्गातच झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत रुईया महाविद्यालयातून पूर्ण केले. खेळाची आवड असलेले महाडेश्वर यांनी कबड्डीचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले होते. सांताक्रुझ पूर्व येथील राजे संभाजी विद्यालयात ते मुख्याध्यापक होते. तसेच घाटकोपरच्या पंतनगरमधील तंत्रशिक्षण विद्यालयातही ते इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. २००२ मध्ये त्यांनी राजीनामा देऊन पहिली निवडणूक लढवली होती. ४० वर्षांहून अधिक काळापासून ते शिवसेनेत कार्यरत होते. विश्वनाथ महाडेश्वर २००२ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००३ मध्ये त्यांची महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदी निवड झाली. २०१७ मध्ये त्यांची मुंबई महापालिकेच्या महापौरपदी निवड झाली. २०१९ पर्यंत मुंबईचे महापौर होते. स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. मुंबई महापालिकेतील सर्वात उच्चशिक्षित आणि अभ्यासू नगरसेवकांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वास्तव्य ह्याच मतदारसंघात आहे. २०२३च्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऋतुजा लटके यांचा पालिकेतून राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी महाडेश्वरांनी विशेष प्रयत्न केले होते. महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेते किरीट सोमय्या मारहाण प्रकरणी महाडेश्वर यांना अटक झाली होती.
विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनाने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाडेश्वर यांची प्रकृती ठीक नव्हती.
‘अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक, उत्तम शिक्षक, शिक्षकांच्या प्रश्नाची जाण असलेला अभ्यासू नगरसेवक, मुंबईचे महापौरपद त्यांनी भूषविले. माझी त्यांना विनम्र श्रद्धांजली’, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महाडेश्वर यांना श्रद्धांजली वाहिली.