केरळ :
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर (Tanur) भागातील ओट्टुमपुरमजवळ रविवारी (७ मे) संध्याकाळी एक पर्यटकांची हाउसबोट उलटली. या अपघातामध्ये बोटीतील मुलांसह २२ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. एनडीआरफ टीम दाखल झाली असून स्थानिक प्रशासन देखील तैनात झाले आहेत. अंडरवॉटर कॅमेऱ्याचा वापर करून बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, अपघातस्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोटीवर सुमारे ४०-५० प्रवासी होते, त्यापैकी २२ जणांचा मृत्यू झाला, तर जखमींना जवळच्या खाजगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे जवान आणि स्वयंसेवकांच्या मदतीने बचावकार्य सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नसून बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केरळचे पर्यटन मंत्री मोहम्मद रियास कोझिकोडहून घटनास्थळी रवाना झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.