मुंबई :
मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलच्या जी. एन. एम. बॅच १९९२ चा स्नेह मेळावा मंगला हायस्कूल कोपरी ठाणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तब्बल ३० वर्षांनी सर्व परिचारिका असलेल्या मैत्रिणी एकत्र आल्याने सहाजिकच उत्साहाला उधाण आले होते. सदर स्नेह मेळाव्याचे आयोजन या बॅचच्या सदस्य उद्योजिका सौ. नेहा निनाद धुरी उर्फ मसुरे गावच्या सुकन्या भारती सावंत यांनी केले होते. यावेळी बोलताना मसूरे गावचे सुपुत्र व मुंबई येथील उद्योजक दीपक सावंत यांनी स्नेह मेळाव्याच्या उत्कृष्ट व नेटक्या आयोजनाबद्दल सौ. नेहा निनाद धुरी यांचे कौतुक केले. या स्नेह मेळाव्यामुळे सर्वजणी एकत्र आलात. रोजच्या कामातून तुमच्या मैत्रिणींसाठी तुम्हाला वेळ देता आला ही सुद्धा एक चांगली उपलब्धता आहे. तुम्ही करत असलेली सेवा ही ईश्वरसेवा आहे. या पुढील स्नेहमेळावा तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसमवेत साजरा कराल अशी मी अपेक्षा करतो. सौ.नेहा धुरी या अतिशय कठीण प्रसंगातून जात पुन्हा त्या समाजसेवेत कार्यरत झाल्या आहेत. यामागे तुमच्या सर्वांच्या सदिच्छा निश्चितच आहेत असे विचार व्यक्त केले.
मसुरे गावच्या माजी सरपंच सौ. लक्ष्मी पेडणेकर यांनी सर्व बॅचच्या सदस्यांना शुभेच्छा देताना कोरोना काळात तुम्ही सर्वांनी बजावलेली सेवा ही ईश्वर सेवा आहे असे सांगितले. या स्नेह मेळाव्याला आमंत्रित केल्याबद्दल सौ. नेहा धुरी आणि त्यांच्या सर्व बॅचमेट सदस्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी उद्योजक दीपक सावंत, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, परीचारिकांच्या शिक्षिका छाया लाड, मनकुमारी मिस्त्री, सुनीता चरण राव, अलका राऊळ आंग्रे, माधुरी पाटणकर आणकेकर, मनीष जैन, उद्योजिका सौ नेहा निनाद धुरी उर्फ भारती सावंत, दत्तप्रसाद पेडणेकर तसेच सर्व सदस्या उपस्थित होत्या. यावेळी बॅचच्या सदस्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ मसुरकर यांनी केले.