अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष
अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात
वॉशिंग्टन:
अमेरिकेचे मुत्सद्दी नेते जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर त्यांच्याच डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांनीही उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून इतिहास घडवला आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून येणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आणि आशियाई महिला आहेत. त्यामुळे अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात झाल्याचं बोललं जात आहेत.
मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या कमला हॅरिस यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. 20 ऑक्टोबर 1964 रोजी कॅलिफोर्नियाच्या ऑकलंडमध्ये कमला हॅरिस यांचा जन्म झाला.
त्यांचे वडील डोनाल्ड हॅरिस हे आफ्रिकेचे असून आई श्यामला गोपालन भारतीय आहेत. श्यामला गोपालन या तामिळनाडूतील चेन्नईच्या असून त्या स्तन कँसर रोगतज्ज्ञ होत्या. यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले येथे डॉक्टरेट करण्यासाठी त्या 1960मध्ये तामिळनाडूहून अमेरिकेत आल्या होत्या. कमला यांचे वडील डोनाल्ड हॅरिस हे स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. ते अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जमैकाहून अमेरिकेला आले होते. तिथेच श्यामला आणि डोनाल्ड हॅरिस यांची भेट झाली आणि प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं. श्यामला आणि डोनाल्ड हॅरिस यांच्या कमला हॅरिस आणि माया या दोन मुली आहेत. मात्र, या दोन्ही बहिणी लहान असतानाच त्यांचे आई-वडील वेगळे झाले होते.
वकील ते उपराष्ट्राध्यक्ष
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या कमला हॅरिस या पहिल्या आशियाई महिला आहेत. त्या डेमोक्रॅटच्या गेराल्डाइन फेरारो आणि रिपब्लिकनच्या सारा पॉलिननंतरच्या प्रमुख पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या तिसऱ्या महिला आहेत. कमला यांचं शिक्षण ऑकलंडमध्येच झालं. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून पदवी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यांनी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये जिल्हा अॅटर्नी म्हणून काम पाहिलं आहे. 2003मध्ये त्या सॅनफ्रान्सिस्कोमध्ये जिल्हा वकील बनल्या होत्या.
त्यांनी 2017मध्ये कॅलिफोर्नियामधून संयुक्त राज्य सीनेटर म्हणून शपथ घेतली होती. या पदावर जाणाऱ्या त्या दुसऱ्या कृष्णवर्णीय महिला होत्या. त्यांनी होमलँड सिक्युरिटी अँड गव्हर्नमेंट अफेयर्स कमिटी, इंटेलिजन्सची सिलेक्ट कमिटी, ज्युडिशिअरी कमिटी आणि बजेट कमिटीवरही काम केलं आहे. विशेष म्हणजे त्या गेल्या वर्षीपर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत होत्या. मात्र, त्यांना पाहिजे तसं पाठबळ न मिळाल्याने त्या या स्पर्धेतून बाहेर पडल्या.