You are currently viewing देवगड येथील लोकअदालतीतीत १८१ प्रकरणे निकाली

देवगड येथील लोकअदालतीतीत १८१ प्रकरणे निकाली

९८ लाख ३३ हजाराची वसूली; ५२ फौजदारी दावे निकाली काढण्यास यश…

देवगड

येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १३१२ प्रकरणांपैकी एकूण १८१ प्रकरणे निकाली तर यामधून ९८ लाख ३३ हजार ५२ रूपये इतकी वसुली करण्यात आली. या लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. बी. वाळके यांच्या हस्ते झाले. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा १३१२ प्रकरणांपैकी एकूण १८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून ९८ लाख ३३ हजार ५२ रूपये इतकी वसुली झाली.

तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका बार असोसिएशन देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगड तालुका वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड. देवानंद गोरे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अविनाश माणगावकर,प्रकाश बोडस, लक्ष्मीकांत नाथगोसावी, इंद्रनील ठाकुर, कौस्तुभ मराठे, प्रसाद करंदीकर, अभिषेक गोगटे, आशिष लोके, आरती खाडीलकर, मैथिली खोबरेकर, संगीता कालेकर, यांच्यासह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नीलेश जगताप व दिवाणी न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारीकडील एकूण २६६ दावे ठेवण्यात आले होते. त्यातील ५२ खटले निकाली काढण्यात आले. यातून ८६ लाख ५८ हजार २८ रूपये इतकी वसुली झाली. तर बँक, दूरसंचार विभाग, ग्रामपंचायत विभाग, नगरपंचायत, महावितरण यातील १०४६ इतकी वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील १२९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून एकूण ११ लाख ७५ हजार २४ रूपये इतकी वसुली झाली. पॅनेल सदस्य म्हणून अॅड. प्रसाद करंदीकर यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा